मार्च २०२० पासून केंद्र सरकारने सातत्याने पेट्रोल, डिझेलसह घरगुती गॅसच्या दरात वाढ केल्याने महिलांना याचा चांगलाच फटका बसत आहे. घरगुती गॅसचे दर गगनाला भिडत चालल्याने केंद्र सरकारचा निषेध करण्यासाठी राष्ट्रवादी महिला काँग्रेसतर्फे जवळा (ता. सांगोला) येथील एका पेट्रोल पंपावरच महिलांनी चूल मांडून इंधन आणि गॅस दरवाढीचा निषेध केला.
यावेळी राष्ट्रवादी महिला काँग्रेसच्या तालुकाध्यक्ष सखुबाई वाघमारे, उपाध्यक्ष जयश्री पाटील, चारूशीला साळुंखे, शशिकला चडचणकर यांच्यासह महिला उपस्थित होत्या.
गॅस दरात तत्काळ कपात करावी
केंद्र सरकार उज्ज्वला गॅस योजनेअंतर्गत घरोघरी गॅस दिला असला तरीही त्याचे सिलिंडर भरणे आज सामान्य नागरिकांना शक्य होत नाही. मोदी सरकारने जेवढा खर्च जाहिरातबाजीवर केला, इतकाच खर्च उज्ज्वला गॅस योजनेवर केला असता तर आज गॅसचे दर गगनाला भिडले नसते. घरगुती गॅसच्या दरात केंद्र सरकारने तत्काळ कपात करावी; अन्यथा यापुढील काळात तीव्र आंदोलन करण्यात येईल, असा इशारा प्रदेश उपाध्यक्षा जयमाला गायकवाड यांनी दिला.