सोलापूर : महापालिकेची आर्थिक ऐपत नसल्याने स्व. शिवसेनाप्रमुखबाळासाहेब ठाकरे यांच्या स्मारकाचे १० कोटी ९५ लाख रुपयांचे काम एकही ठेकेदार घेण्यास तयार नसल्याचे स्पष्ट झाले. बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीच्या पार्श्वभूमीवर हा विषय पुन्हा चर्चेला आला आहे.
बाळासाहेब ठाकरे यांच्या निधनानंतर महापालिकेला सर्वात प्रथम म्हणजे ११ नोव्हेंबर २०१२ रोजी सोलापुरात त्यांचे स्मारक बांधण्याचा ठराव केला होता. यासाठी प्रथम रेवणसिद्धेश्वर मंदिर आणि त्यानंतर पत्रकार भवन चौकातील जागाही निश्चित करण्यात आल्या. या जागांवरुन अडचणी निर्माण झाल्यानंतर पोलीस मुख्यालयासमोर स्मारक बांधण्याचे काम निश्चित करण्यात आले. त्यासाठी १० कोटी ९५ लाख रुपयांचा आराखडा तयार करण्यात आला.
१४ डिसेंबर २०१७ रोजी या कामाची निविदा काढण्यात आली. हे काम महापालिकेच्या भांडवली निधीतून निश्चित करण्यात आले आहे. सध्या महापालिकेवर ३७२ कोटी रुपयाचं देणं आहे. मक्तेदारांची ११२ कोटी रुपयांची बिले थकली आहेत. त्यात नव्याने केलेल्या कामाचे पैसे मिळणार नसल्याने मक्तेदारांनी ठाकरे यांच्या स्मारकाच्या कामास रस दाखविलेला नाही. सध्या या प्रस्तावाच्या फायलीवर धूळ येत असल्याचे पाहायला मिळत आहे.
महाराष्ट्रात सर्वप्रथम साहेबांच्या स्मारकाला मंजुरी देणाºया आपल्या शहरात अद्याप कामाला प्रत्यक्ष सुरुवात होऊ शकली नाही याची खंत वाटते. भांडवली निधीतून काम केल्यास पैसे कधी मिळतील याची खात्री नसल्याने मक्तेदार काम करण्यास पुढे येईनात. शासनाकडून निधी मिळावा किंवा राज्यसभा, विधानसभेतील सेनेच्या प्रतिनिधींकडून निधी उपलब्ध व्हावा याकरिता देखील आम्ही प्रयत्न केला, परंतु अपेक्षित प्रतिसाद मिळाला नाही. उशीर होत असला तरी निश्चित चांगले स्मारक येथे व्हावे यासाठी प्रयत्नशील राहू.- गुरुशांत धुत्तरगावकर, नगरसेवक, शिवसेना