सोलापूर : आपला इतिहास किती खरा आणि किती खोटा हे तपासून पाहण्याची गरज आहे. विश्वाच्या इतिहासाशी हा इतिहास जोडला तर नवा इतिहास निर्माण होईल, असे प्रतिपादन तुलनाकार तथा गोवा विद्यापीठातील इंग्रजीचे निवृत्त विभागप्रमुख प्रा.डॉ. आनंद पाटील यांनी केले.
प्रकाशनापूर्वीच चर्चेत आलेल्या ‘महाराष्ट्राला माहीत नसलेले सम्राट शिवाजी’ या आपल्या पुस्तकासंदर्भात येथील साहित्यक्षेत्रातील मंडळींशी खासगी भेटीसाठी आले असता पत्रकारांशी ते बोलत होते. ते म्हणाले, शिवाजी महाराजांच्या जीवनकार्यातील अनेक संदर्भ इतिहासात अद्यापही उल्लेखलेले नाहीत. शिवाजी महाराज यांच्या कार्याचा गौरव केवळ देशी इतिहासकारांनीच नाही तर विदेशी साहित्यिकांनीही केला आहे. स्वामी विवेकानंद यांनी त्यांचा उल्लेख सिंह असा केला आहे. तर रवींद्रनाथ टागोर यांनी एक दीर्घकाव्यच त्यांच्यावर लिहिलेले आहे.
शिवाजी महाराजांचा छत्रपती असा उल्लेख केला जातो; मात्र छत्रपती हा शब्द धर्माने संकुचित केला आहे. प्रत्यक्षात छत्रपती या शब्दाचा अर्थ वेगळा आहे. तो लक्षात घेतला तर ते केवळ छत्रपती नसून सम्राट आहेत, हे मान्य करावे लागेल. कसलाही राजकीय वारसा नसतानाही एक सर्वसामान्य शेतकऱ्या चा मुलगा स्वकर्तृत्वावर राजा होतो, ही घटना अत्यंत मोठी आहे. त्यामुळे सम्राट असा ज्या राजांचा उल्लेख होतो, त्यांच्या पंगतीमध्ये शिवाजी महाराजांना स्थान असावे. मोर्चे काढण्यापलीकडे आणि घोषणा देण्यापलीकडे जाण्यासाठी आपले पुस्तक महत्त्वाचे असल्याचा दावा त्यांनी केला. मराठीतील इतिहास हे अज्ञानाचे उत्पादन असल्याची टीका त्यांनी केली. आपल्या पुस्तकातील सर्व नोंदी आणि विधाने आकसाने नसून पुराव्यावरून आहे, असाही दावा त्यांनी केला.