आगामी गाळप हंगामात इथेनॉलचे उत्पादन व पुरवठ्यासंदर्भात अकलूज येथे पत्रकारांशी ते बोलत होते. डिसेंबर २०२० नंतर केंद्र सरकारने इथेनॉलसंदर्भात सकारात्मक धोरण घेतले आहे. इथेनॉल दरवाढीबरोबरच ते पेट्रोलमध्ये मिसळण्यासाठी जास्तीचे प्रमाण ठरवून दिले आहे. सध्या हे प्रमाण १० टक्के असून सन २०२३ पासून पेट्रोलमध्ये इथेनॉल मिसळण्याचे प्रमाण २० टक्क्यांपर्यंत वाढविण्याचे केंद्राच्या विचाराधीन आहे. थेट उसाच्या रसापासून तयार होणाऱ्या इथेनॉलला ६२.६५ पैसे, बी-हेवी मोलॅसिसपासून तयार होणाऱ्या इथेनॉलला ५७.४८ पैसे, तर सी-हेवी मोलॅसिसपासून तयार होणाऱ्या इथेनॉलला ४५.६२ पैसे दर मिळत आहे.
थेट उसाच्या रसापासून तयार केलेल्या इथेनॉलमुळे साखर उताऱ्यात थोडीशी घट येत असली तरी, इथेनॉल विक्रीचे पैसे २० दिवसात मिळत असल्याने व्याजाचा भुर्दंड कमी होतो. साखरेचे उत्पादनही नियंत्रणात राहते. साखर कारखान्यांनी राज्यातील ऑईल कंपन्यांची इथेनॉलची मागणी पूर्ण करून शेजारील गुजरात, कर्नाटक, तेलंगणा, मध्य प्रदेश, आंध्र प्रदेश, तामिळनाडू, गोवा, केरळ या राज्यांतील ऑईल कंपन्यांच्या डेपोंना जास्तीत जास्त इथेनॉलचा पुरवठा करण्यावर भर देण्याची गरज आहे. इथेनॉल उत्पादनामुळे साखरेचे दरही कारखान्यांना परवडण्याइतपत राहतील, अशी अपेक्षा विजयसिंह मोहिते - पाटील यांनी व्यक्त केली.
गतवर्षी ७ लाख १० हजार टन साखर उत्पादनात घट
साखर आयुक्तालयातील आकडेवारीनुसार आगामी गळीत हंगामात १ हजार १८९ लाख टन उसाचे गाळप होईल असा अंदाज आहे. त्यातून ११२ लाख टन साखर (इथेनॉलचे उत्पादन गृहित धरून) उत्पादन होण्याचा अंदाज आहे. गतवर्षी देशातून ६० लाख टन साखर निर्यात झाल्याने साखरेचे साठे कमी असले तरी, यंदा राज्यात विक्रमी उत्पादन होणार आहे. गतवर्षी थेट उसाच्या रसापासून, बी-हेवी व सी-हेवी मोलॅसिसपासून एकूण ५० कोटी ७३ लाख लिटर इथेनॉलचा पुरवठा ऑईल कंपन्यांना केला आहे. उर्वरित पुरवठाही केला जात आहे. गतवर्षी इथेनॉल निर्मितीमुळे ७ लाख १० हजार टन साखरेचे उत्पादन कमी झाले असल्याचे विजयसिंह मोहिते-पाटील यांनी सांगितले.