बाळासाहेब बोचरे सोलापूर दि १६ : छत्रपती शिवरायांनी स्वराज्य स्थापनेसाठी दुष्मनांशी लढा देताना तलवारीचा वापर केला. त्याच शिवरायांचे हे स्वराज्य सांभाळण्यासाठी आज केवळ जिभेवर नियंत्रण ठेवण्याची गरज आहे. केवळ विषारी प्रचारामुळे जातीय सलोखा कलुषित केला जातो, याला कुठेतरी पायबंद बसला पाहिजे, असे प्रतिपादन मध्यवर्ती शिवजन्मोत्सवचे अध्यक्ष रसूल पठाण यांनी केले. सोलापूरच्या इतिहासात छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती एका मुस्लीम कार्यकर्त्याच्या अध्यक्षतेखाली साजरी होतेय याचा मला अभिमान वाटतो, असे ते पुढे म्हणाले. छत्रपती शिवराय हे जाती-पातीपलीकडचे राजे होते. त्यांचा लढा मुघल साम्राज्याविरुद्ध असला तरी मुस्लीम समाजातील १९ शिलेदार त्यांच्या फौजेत होते. त्यांचे योगदान लाखमोलाचे होते हे आजही कोणी नाकारत नाही. या राजाबद्दल मुस्लीम समाजामध्येही कधी अनादराची भावना नव्हती आणि नाही. पण शिवजयंती साजरी करण्याची संधी आम्हाला कधी मिळाली नाही. मराठा समाजातील नेत्यांनी एकत्र येऊन एक जाती-पातीपलीकडे जाऊन विचार करणारा निर्व्यसनी तरुण म्हणूनच माझी एकमताने अध्यक्षपदी निवड केली. ही बाब माझ्यासाठी अभिमानाची आहे, तसेच शिवप्रेमींचा मनाचा मोठेपणा दर्शवणारी आहे. आपली अध्यक्षपदी निवड का झाली असे वाटते? या प्रश्नाला उत्तर देताना रसूलभाई म्हणाले, लष्कर परिसरामध्ये जातीय सलोखा ठेवण्यात आपण मोलाचे योगदान दिले आहे. गरिबी जवळून पाहिल्याने व भोगल्याने पैशाची मस्ती कधी दाखवलीच नाही. आमचा शाब्दी सोशल ग्रुप तयार झाला आहे. त्यामुळे लष्कर मध्यवर्ती गणेश मंडळाच्या अध्यक्षपदी माझी निवड झाली. आम्ही अनेक चांगले बदल केले आहेत. गुलालाऐवजी फुलांची उधळण करणे, अन्नदान, पाणी वाटप असे सामाजिक उपक्रम राबवले. त्यामुळे आपली शिवजन्मोत्सव मध्यवर्ती मंडळाच्या अध्यक्षपदी निवड झाली. मराठा समाजातील दास शेळके, नाना काळे, राजन जाधव या प्रमुख नेत्यांनी आपल्या नावाची शिफारस केली अन् त्याला एकमताने मंजुरी मिळाली.---------------------------मुस्लीम शिलेदारांचा पेहराव केलेल्या युवकांची मिरवणूक- अध्यक्ष या नात्याने आपणाला शिवजयंती उत्सवात काही बदल करावा वाटतो का किंवा करणार का असे विचारता रसूलभाई म्हणाले, परंपरा मोडता येत नाहीत आणि जनतेला त्रास होणार नाही, असा मधला मार्ग काढावाच लागतो. अलीकडे डॉल्बीचे फॅड आले आहे. ते आम्हाला अजिबात मान्य नाही. शिवरायांच्या काळात निरोप किंवा सांकेतिक संदेश म्हणून तोफांचे बार किंवा गवताच्या गंजी पेटवल्या जायच्या, आज त्याची गरज राहिली नाही. जल्लोष साजरा करण्याची पद्धतही बदलली पाहिजे. यंदा प्रथमच शिवरायांचे १९ मुस्लीम शिलेदारांचा पेहराव केलेल्या तरुणांची मिरवणूक काढण्यात येणार आहे. शिवाय रहीम शेख या तरुणाचे व्याख्यान होणार आहे.
स्वराज्य रक्षणासाठी जिभेवर नियंत्रणाची गरज, सोलापूर मध्यवर्ती शिवजन्मोत्सव मंडळाचे अध्यक्ष रसुल पठाण यांचे मत, स्वराज्य स्थापनेत मुस्लिमांचे योगदान मोलाचे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 16, 2018 4:01 PM
छत्रपती शिवरायांनी स्वराज्य स्थापनेसाठी दुष्मनांशी लढा देताना तलवारीचा वापर केला. त्याच शिवरायांचे हे स्वराज्य सांभाळण्यासाठी आज केवळ जिभेवर नियंत्रण ठेवण्याची गरज आहे.
ठळक मुद्देसोलापूरच्या इतिहासात छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती एका मुस्लीम कार्यकर्त्याच्या अध्यक्षतेखाली साजरी होतेय यंदा प्रथमच शिवरायांचे १९ मुस्लीम शिलेदारांचा पेहराव केलेल्या तरुणांची मिरवणूक काढण्यात येणार आहे