सोलापूर : स्वस्तात मिळणाºया वैद्यकीय सेवा हे सोलापूरचे वैशिष्ट्य आहे. यात आणखी भर घालण्यासाठी शहर रोजगाराभिमुख करण्यासाठी मेडिकल क्लस्टर होणे गरजेचे आहे. यामुळे प्रशिक्षण संस्था, वैद्यकीय, साहित्याची निर्मिती या क्लस्टरमध्ये होऊ शकते. यासाठी नागरिकांसोबतच लोकप्रतिनिधींचा रेटा आवश्यक असल्याचे डॉक्टरांचे म्हणणे आहे.
सोलापुरात टेक्स्टाइलचे क्लस्टर, कोकणात हापूसचे क्लस्टर तर कोल्हापुरात चपलांचे क्लस्टर तयार झाले आहे. तिथे त्यांच्या उत्पादनासह इतर साहाय्य करणारे उत्पादन होते.
त्याप्रमाणे सोलापुरात मेडिकल व त्या संबंधीचे व्यवसाय वाढू शकतात. सध्या शहरातून इतर मोठ्या शहरात स्थलांतराचे प्रमाण वाढले आहे. तरुणांना रोजगार मिळाल्यास काही प्रमाणात तरी स्थलांतर कमी होऊ शकते.
सध्या सोलापूर हे मेडिकल हब म्हणून प्रस्थापित झाले आहे. येथे चार राज्यातील रुग्ण उपचार घेतात. मात्र मध्य प्रदेश, दिल्ली, राजस्थान, उत्तराखंड तसेच उत्तर-पश्चिमेकडील राज्यांमधील रुग्ण सोलापुरात येत नाहीत. आपल्याकडे उच्च शिक्षित, प्रशिक्षित असे डॉक्टर आहेत. त्या स्तरावरील उपचारही आपल्याकडे होतात. सध्या देशात कुठेच मेडिकल क्लस्टर नाही, सोलापुरात पहिल्यांदा याची निर्मिती होऊ शकते.
मेडिकल क्लस्टर म्हणजे काय?जशा प्रकारे एमआयडीसीमध्ये विविध प्रकारचे उद्योग एकत्र आणण्यात आले आहेत त्याचप्रमाणे वैद्यक ीय सेवा देणारे रुग्णालय एकाच परिसरात आणणे. जिथे सर्व प्रकारच्या वैद्यकीय सेवा या एकाच परिसरात मिळू शकतात. या ठिकाणी सर्व रुग्णालयांना सामाईक सुविधा देता येतात. एवढेच नाही तर रुग्णालयासोबत इतर व्यवसाय सुरू करण्याची संधी मिळते. सीरिंज, बँडेज यासोबतच इतर वैद्यकीय साहित्यांची निर्मिती एकाच ठिकाणी केली जाऊ शकते. यासाठी शासनाकडून सवलतीच्या दरात जागा, वीज, पाणी उपलब्ध करून देणे गरजेचे आहे. तसेच मेडिकल क्लस्टर सुरू होण्यासाठी करामध्ये सवलत देण्याची गरज आहे.
एकाच परिसरात सर्व प्रकारच्या वैद्यकीय सेवा देणे, ही काळाची गरज आहे. रुग्णांची अशी अपेक्षा असणे हे योग्यच आहे. क्लस्टर तयार झाल्यास मेडिकल टुरिझम वाढेल. याचा फायदा फक्त वैद्यकीयच नाही, तर इतर क्षेत्रांनाही होऊ शकतो. आपल्याकडे वेगवेगळ्या आजारांवर उपचार करणारे तज्ज्ञही आहेत.- डॉ. राजीव दबडे, स्त्रीरोगतज्ज्ञ
शहराला स्मार्ट सिटी जाहीर केल्यानंतर शहरासाठीच्या योजना मागविण्यात आल्या होत्या. त्यावेळी मी आपल्या शहरात मेडिकल क्लस्टर होऊ शकते, हे पटवून दिले होते. यासाठी प्रयत्न करणे आवश्यक असल्याचे सांगितले होते. मात्र, कालांतराने हा प्रस्ताव मागे पडला. - डॉ. सचिन जम्मा, शल्यविशारद
वैद्यकीय सेवा की व्यवसाय यामुळे अडचणएमआयडीसीमधील कंपन्या या उद्योग गटात येतात, त्यामुळे त्यांना शासनाकडून सुविधा मिळतात. मात्र, वैद्यकीय क्षेत्र हे व्यवसाय नाहीतर सेवा या गटात येते. यामुळे क्लस्टर सुरू करण्यासाठी कंपन्यांना देण्यात येणाºया सवलती रुग्णालयाला देता येत नाहीत, असे सांगितले जाते. जेव्हा रुग्णाला रुग्णालयाकडून मिळणाºया सेवेत किंवा उपचारात त्रुटी आढळली तर ते ग्राहक मंचाकडे जाऊ शकतात. अशावेळी वैद्यकीय क्षेत्र हे सेवा नाही तर व्यवसाय ठरते, असे दुटप्पी धोरण वैद्यकीय क्षेत्रासाठी राबविले जात असल्याचे डॉक्टरांचे म्हणणे आहे.