सोलापूर : सोलापूर शहरातील २१ आणि पंढरपूर व अक्कलकोट येथील प्रत्येकी एक अशा एकूण २३ परीक्षा केंद्रावर रविवार, १३ सप्टेंबर रोजी 'नीट' परीक्षा पार पडत आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर परीक्षेचे नेटके आणि काटेकोर नियोजन करण्यात आल्याची माहिती परीक्षा समन्वयक प्रा. एस.डी. शिरगावे यांनी दिली.
नॅशनल टेस्टिंग एजन्सी (एनटीए) च्या मार्फत वैद्यकीय प्रवेशासाठीची 'नॅशनल एलिजिबिलिटी कम एन्ट्रन्स टेस्ट (नीट) ही परीक्षा रविवारी देशभरातील विविध केंद्रांवर पार पडत आहे. सोलापूर शहरातील २१ आणि पंढरपूर, अक्कलकोट येथील प्रत्येकी एक अशा एकूण २३ परीक्षा केंद्रांवर ही परीक्षा पार पडणार आहे. एकूण ८ हजार २२८ परीक्षार्थी ही परीक्षा देणार आहेत. 'कोवीड -19' च्या पार्श्वभूमीवर सर्व परीक्षा केंद्रांवर प्रतिबंधात्मक उपाययोजनांचे काटेकोर पालन करण्याच्या सूचना परीक्षार्थींना देण्यात आल्या आहेत.
'एनटीए'ने दिलेल्या सर्व सूचनांची अंमलबजावणी या परीक्षार्थींनी करावयाची आहे. परीक्षार्थी परीक्षा केंद्रावर पोचल्यावर त्यांचे मास्क काढून घेऊन त्यांना नवीन मास्क देण्यात येणार आहेत. प्रत्येक विद्यार्थ्याने परीक्षेसाठी आपल्या पेपरच्या वेळेपूर्वी परीक्षा केंद्रावर पोहोचावे, असे प्रा. शिरगावे यांनी सांगितले.--------------नीट परीक्षेसाठी सर्व परीक्षा केंद्रांवर चोख नियोजन केले आहे. परीक्षेपूर्वी प्रत्येक विद्यार्थ्याचे थर्मल स्क्रीनिंग होईल. त्यामुळे विद्यार्थ्यांनी वेळेपूर्वी पोहोचावे. तसेच ज्या विद्यार्थ्यांना ताप व इतर लक्षणे दिसतील अशा विद्यार्थ्यांसाठी स्वतंत्र हॉलची व्यवस्था केली असून, त्याठिकाणी ते परीक्षा देतील. परीक्षेवेळी परीक्षार्थींमध्ये सोशल डिस्टन्सिंग राखण्यासाठी विशेष दक्षता घेऊन बैठक व्यवस्था करण्यात आली आहे.-प्रा. एस. डी. शिरगावे, परीक्षा समन्वयक