प्रत्येक माणसात कोणत्या ना कोणत्या उणिवा असतातच. त्या उणिवा कळल्यावर त्या दूर करण्यासाठी प्रयत्न करून आपल्यात सुधारणा करता येतील यासाठी ‘निंदकाचे घर असावे शेजारी..’ अशी उक्ती जगरूढ झाली. परंतु सध्याचे जीवनमान पाहता गंगा उलटी वाहतेय की काय? असंच काहीसं वाटत आहे. आपल्या देशाची संस्कृती तशी उच्चस्तरीय मानली जाते. शेजारधर्म, अतिथी देवो भव, एकमेका साहाय्य करू अवघे धरू सुपंथ यासारख्या काही परंपरा इथे पूर्वापार चालत आहेत. काहीअंशी या परंपरा चांगल्याप्रकारे चालू आहेत परंतु, ‘सताड कवाडे बंद’ ही भीतीदायक संकल्पना आवासत आहे.
आमच्या जवळच्या शिक्षकांनी सांगितलेला किस्सा आहे. त्यांच्या शेजारी सर्व बडे आसामी राहतात. सगळ्यांची घरे स्टार वन आहेत. सगळ्यांच्या घरी लक्ष्मी पाणी भरते असंच काहीसं वैभव आहे सगळ्यांकडे. परंतु सगळेच्या सगळे मुके आहेत कारण कुणीच कुणाशी कोणत्याही विषयावर बोलत नाहीत. प्रत्येकजण स्वत:चे स्वत:ला राजे समजतात म्हणे. कारण एकच ‘त्यांच्याशी बोलल्याने आपली प्रतिष्ठा कमी होईल.’ कुणी कुणाबद्दल चांगले तर सोडा वाईटही बोलत नाहीत. सगळे घुम्यासारखे असतात. ते त्यादिवशी सकाळी पेपर वाचत असताना कुणाचा तरी फोटो पाहून अचंबित झाले. कारण ही व्यक्ती तर आपल्या कॉलनीत राहते आणि काल ती देवाघरी गेली.... कसं...काय.. आणि ते प्रश्नांकित नजरेने त्या बातमीकडे एकटक पाहत राहिले. काय म्हणावे याला? इथे नक्की माणसेच राहतात ना!माझा एक मित्र नेहमी त्याच्या शेजाºयाबद्दल तक्रारी सांगत असतो. एकदा तर तो तावातावाने म्हटला, ‘त्या एडिसनने खूप घोळ घातला आहे. कशाला नाही त्या उचापत्या करून विजेच्या बल्बचा शोध लावलाय देव जाणे..?’ मी आपलं विनोद बुध्दीने म्हटलं, ‘तुला रात्रीचं दिसत नाही ना म्हणून..!’ तो वैतागून म्हणाला, ‘बस्स झालंय रे, रात्रभर झोप नाही... आणि ही रोजचीच कटकट झाली आहे.
आम्हाला.’‘का! रे...काय झालं?’ मग तर तो सविस्तर सांगायलाच लागला, ‘आमच्या शेजारी ना रात्रीचे दहा वाजले की घराबाहेरील बल्ब चालू-बंद..चालू-बंद करून झोपेचं खोबरं करतात. धड स्वत:ही झोपत नाहीत आणि आम्हालाही झोपू देत नाहीत. एकेकदा तर एवढं राग येतं की एम.एस.ई.बी. ला सांगूनच टाकावं की... आमच्या एरियात लाईटच लावू नका म्हणून..‘ अरे चोरांची वगैरे भीती वाटत असेल त्यांना.’ म्हणून वेळ मारून नेली. परंतु अशा वृत्तीची माणसे असूच कसे शकतात? असा प्रश्न मलाही पडतोच नेहमी.
आमच्या लहानपणी गावाकडील शेजारी आमचे काही चुकले तर थोबाडीत दोन लगावायचे आणि सज्जड दम भरायचे. आमच्या घरच्यांपेक्षा तेच जास्त रागवायचे आणि लाडही करायचे. आमच्या शेजारच्या लोकांना आम्ही कधीच शेजारी मानत नसे. आमचे शेजारी म्हणजे आमचंच कुटुंब, आमचेच काका-काकू, भाऊ-बहीण असंच काहीसं आमच्या मनात रूजलेलं. त्यामुळे त्यांच्यात व आमच्यात अंतर नाहीच. आज मात्र कॉलनी, अपार्टमेंट, वसाहत, विहार अशा संकल्पना सत्यात उतरताना सोबत दुजाभावाची पाळेमुळे खोलवर रूजत आहेत.
‘आपला तो बाळ्या, शेजारचा मात्र कार्टा’ म्हणण्याची प्रथा वाढत चालली आहे. शेजारच्या मुलांसोबत बोलायचं नाही, खेळायचं नाही असं सज्जड दम भरणे सुरू झालं. शेजारची लहानं मुलं आपल्या घरासमोर खेळलेली, गोंधळ घातलेलीही चालत नाही. आपल्यामुळे शेजाºयांना किती त्रास होईल याचाच विचार मनात घोळू लागला. शेजारी कुणी काही नवीन आणलं तर आपला जळफळाट वाढला. या अशा वृत्तीमुळे ‘शेजारी’ या शब्दाची प्रतिमाच बदलत आहे. ‘कुणी निंदा, कुणी वंदा, मीच माझा गोविंदा’ म्हणण्याची अहम भावना वेळीच थांबली पाहिजे, नाही तर ‘निंदकाचे घर नसावे शेजारी...’ म्हणण्याची वेळ येईल याबद्दल दुमत नाही.- आनंद घोडके(लेखक जिल्हा परिषद शाळेत शिक्षक आहेत.)