अक्कलकोट : तीर्थक्षेत्र अक्कलकोट येथे कोरोना रुग्णांसाठी सर्व सोयीयुक्त मोफत शंभर बेडची सोय करण्यात आली आहे. नागरिकांनी आजार अंगावर न काढता तत्काळ हॉस्पिटलमध्ये दाखल होऊन उपचार घ्यावेत, असे आवाहन आमदार सचिन कल्याणशेट्टी यांनी पत्रकार परिषदेद्वारे केले.
यावेळी प्रांताधिकारी डांगे, तहसीलदार अंजली मरोड, गटविकास अधिकारी महादेव कोळी, तालुका आरोग्य अधिकारी डॉ. अश्विन करजखेडे, वैद्यकीय अधीक्षक डॉ. अशोक राठोड यांची उपस्थित होती.
यापूर्वी सुरू केलेल्या २५ बेड केवळ चार दिवसांत फुल्ल झाले होते. याचा गांभीर्याने विचार करून पुन्हा ७५ मिळून १०० बेड असे मोफत हॉस्पिटल कार्यरत आहेत. ग्रामीण भागातील मृत्यूसंख्या पाहता चिंताजनक आहे. लक्षणे दिसताक्षणी नागरिकांनी आजार अंगावर न काढता उपचार घ्यावेत, असे आवाहन केले आहे.
तहसीलदार अंजली मरोड कोणीही अपप्रचाराला बळी न पडण्याचे आवाहन केले. तालुक्यात मृत्यूदर वाढत आहे. तो कमी करण्यासाठी लोकांनी सजगता बाळगावी. तालुक्यातील ३२ गावांचे दौरे केले असता, भयानक परिस्थिती समोर आली आहे. आजार अंगावर काढत असल्याने तालुक्यात मृत्यूदर ५.५ टक्के आहे. सुरुवातीला साडेचार लाख तर आतासुद्धा २५ लाखांची मदत आमदार निधीतून झाल्याचे तहसीलदार मरोड यांनी सांगितले.
--
२ हजार १९० रुग्ण झाले बरे
आतापर्यंत तालुक्यात २ हजार ६८७ कोरोना रुग्ण बाधित असून, २ हजार १९० रुग्ण बरे हाेऊन घरी परतले आहेत. सध्या कोरोना केअर सेंटरमध्ये ३६६ रुग्णांवर उपचार सुरू आहेत. तसेच हॉस्पिटलमध्ये ११८ रुग्ण दाखल झाले होते. सुरुवातीला काही साहित्य कमी असल्याने गंभीर अशा २७ रुग्णांना सोलापूर येथे पाठविण्यात आले होते. ३१ रुग्ण उपचार घेऊन बरे होऊन घरी गेले आहेत. ५२ रुग्णांवर सध्या उपचार सुरू आहेत. ७५ बेड, ऑक्सिजन, १० बायपॅक, १५ नॉर्मल बेड कार्यरत आहेत. दोन कोविड केअर सेंटर सुरू आहेत. त्या ठिकाणी जेवण, नाष्टा, चहा, शुद्ध पाणी, अशी व्यवस्था केल्याची माहिती डॉ. आश्विन करजखेडे, डॉ. अशोक राठोड यांनी दिली.