काळगी (जि गुलबर्गा) येथील श्रीदेवी मल्लिकार्जुन अक्कलकोट (वय ३०) या विवाहिता चार वर्षापासून हृदय रुग्ण होत्या. त्यांना साधारण हालचाली करताना अथवा चालताना खूप धाप लागायची. स्थानिक रुग्णालयात तपासणी केली. हृदयरोगाच्या डॉक्टराना दाखवण्याचा सल्ला मिळाला. बेंगळुरू येथे सुप्रसिद्ध डॉक्टरांनी तपासणीनंतर ओपन हार्ट शस्त्रक्रियेशिवाय पर्याय नसल्याचा सल्ला देण्यात आला. तोपर्यंत इंजेक्शन, औषधांनी थोडासा आराम मिळत राहिला. पण मूळ आजार काही पाठ सोडत नव्हता.
ओपन हार्ट सर्जरीचा खर्च पाच लाखांचा त्यात जोखीम मोठी. शस्त्रक्रियेनंतर रुग्ण दगावण्याची शक्यताही डॉक्टरांनी वर्तवलेली. अशा स्थितीत घाबरलेल्या श्रीदेवी अक्कलकोट यांनी शस्त्रक्रिया नकोच अशी भूमिका घेतली. त्रास दिवसेंदिवस वाढत होता. एका नातलगाने कुंभारीच्या अश्विनी ग्रामीण हॉस्पिटल मधील हृदयरोग तज्ञ डॉ राहूल कारीमुंगी याना दाखवण्याचा सल्ला दिला. त्यानुसार रुग्ण महिला आणि त्यांचे पती मल्लीकार्जून अक्कलकोट यांनी कुंभारी येथे येऊन डॉ. कारीमुंगी यांना पूर्वीचे वैद्यकीय अहवाल आणि उपचार अवगत केले.
तपासणीत श्रीदेवी यांच्या हृदयाला रक्त पुरवठा करणारी डाव्या बाजूची महत्वाची झडप (मायट्रेल व्हॉलव्ह) इन्फेक्शनमुळॆ लहानपणी आकुंचित झाली होती. झडपेचा आकार ०.८ चौ सेंमी होता. साधारण व्यक्तीच्या झडपा ४ चौ सेंमी आकाराच्या असतात. झडपा आकुंचित पावल्याने रक्ताभिसरण क्रियेत मोठा अडथळा होता. त्यात हृदयाजवळ रक्ताची गाठ होती. त्यामुळे बेंगळुरूच्या डॉक्टरांनी ही शस्त्रक्रिया गंभीर स्वरूपाची, रुग्णांच्या जीवावर बेतणारी असल्याचेही बजावले होते. डॉ. कारीमुंगी यांनी आव्हान स्वीकारले. या महिलेवर बलून मायट्रल व्हाल्वोटोमी शस्त्रक्रिया करण्यात आली.
कुंभारी हॉस्पिटलमध्ये अद्ययावत वैद्यकीय उपकरणे उपलब्ध आहेत. ट्रस्टी मेहुल पटेल यांनी ग्रामीण रुग्णांसाठी सर्व सोयी-सुविधा पुरवल्याने अशा अवघड शस्त्रक्रिया पार पाडणे शक्य असल्याचे डॉ. कारीमुंगी यांनी सांगितले. अधिष्ठाता डॉ. माधवी रायते यांनी डॉक्टरांचे अभिनंदन केले. या शस्त्रक्रियेसाठी निवासी वैद्यकीय अधिकारी डॉ बसवनगौडा, डॉ. शिरीष पिचके यांचे सहकार्य लाभले.
----
गुंतागुंतीची अन अवघड शस्त्रक्रिया
डॉ. राहुल कारीमुंगी यांनी बलूनच्या (फुगा) सहाय्याने मायट्रल व्हाल्वोटॉमी शस्त्रक्रिया केली. या शस्त्रक्रियेनंतर ०.८ चौ सेंमी झडपेचा आकार वाढवण्यात आला. आता ती झडप दुप्पट म्हणजे १.६ चौ सेंमी आकाराची झाल्याने रक्ताभिसरणक्रिया सुलभतेने होण्यास मदत झाली. हृदयातील रक्ताची ‘ती’ गाठ इंजेक्शनच्या सहाय्याने नियंत्रित ठेवण्यात यश आले. ओपन हार्ट सर्जरीने हृदयाच्या झडपा बदलण्याऐवजी त्यांचा या शस्त्रक्रियेने आकार वाढवून रुग्णाला दिलासा दिला .
----------
खर्चात कपात, दोनच दिवसांत रुग्ण घरी
नामांकित हॉस्पिटलमध्ये ओपन हार्ट सर्जरीसाठी किमान पाच लाख रुपये खर्च अपेक्षित होता. मात्र अश्विनी ग्रामीण रुग्णालयात केवळ अर्ध्या खर्चात शस्त्रक्रिया करण्यात आली. अवघ्या दोन दिवसांत रुग्णाला डिस्चार्ज देऊन घरी पाठवण्यात आले. रुग्ण ठणठणीत असून झडपांची हालचाल नीटपणे सुरू झाल्याने नातलगांनी सुटकेचा निश्वास सोडला.
-------
कोट
श्रीदेवी अक्कलकोट यांच्यावर बलूनद्वारे केलेली मायट्रल व्हालवोटॉमी ही शस्त्रक्रिया जोखमीची होती. ती यशस्वीपणे पार पाडताना धाकधूक होतीच.परंतु आता झडपा व्यवस्थित काम करतात. त्यांना किमान दहा वर्षे शस्त्रक्रिया करण्याची गरज भासणार नाही .
- डॉ. राहुल कारीमुंगी, हृदयरोग तज्ज्ञ, अश्विनी ग्रामीण रुग्णालय, कुंभारी
-------
कोट
गुलबर्गा बेंगलोरु येथील मोठ्या रुग्णालयात ओपन हार्ट सर्जरी शिवाय पर्याय नाही असे सांगण्यात आले होते. अनेक नामवंत डॉक्टरांनी हाच सल्ला दिला. त्यामुळे आमचे हात टेकले होते. डॉ. राहुल कारीमुंगी आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी अगदी लीलया शस्त्रक्रिया करून आम्हाला दिलासा दिला
- मल्लिकार्जुन अक्कलकोट, रुग्ण महिलेचे पती
---------
फोटो ओळी
अश्विनी ग्रामिण रुग्णालयात यशस्वी शस्त्रक्रियेनंतर रुग्ण श्रीदेवी अक्कलकोट यांच्यासमवेत त्यांचे पती मल्लिकार्जुन, डॉ. राहुल कारीमुंगी, निवासी वैद्यकीय अधिकारी डॉ बसवन गौडा, डॉ शिरीष पिचके आदी.