कोल्हापूर : अनुभवाला तांत्रिक ज्ञानाची जोड देऊन शेती, ग्रामीण विकासासह रोजगारनिर्मितीची नवी दिशा शिवाजी विद्यापीठाने ‘यशवंतराव चव्हाण स्कूल आॅफ रुरल डेव्हपलमेंट’द्वारे उपलब्ध करून दिली आहे. राज्य शासनाच्या मदतीने सुरू झालेल्या स्कूलच्या माध्यमातून करिअरचा वेगळा मार्ग तरुण-तरुणींना मिळाला आहे.विद्यापीठाने सुवर्णमहोत्सवी वर्षानिमित्त राज्य शासनाला यशवंतराव चव्हाण अध्यासन स्थापनेबाबतचा प्रस्ताव सादर केला. त्याबाबत सकारात्मक भूमिका घेत शासनाने २०१२ मध्ये थेट ‘यशवंतराव चव्हाण स्कूल आॅफ रुरल डेव्हलपमेंट’च्या प्रारंभासाठी ८ कोटी ५० लाखांचा निधी मंजूर केला. त्यानंतर गेल्या दोन वर्षांपूर्वी स्कूलची सुरुवात झाली. आनंद (गुजरात) येथील इन्स्टिट्यूट आॅफ रुरल मॅनेजमेंटच्या धर्तीवर स्कूल कार्यरत आहे. ग्रामीण विकासात युवकांचे बलस्थान वाढविणे. शेती उत्पादनात युवकांनी स्वत: सहभागी होऊन दुसऱ्याला रोजगार मिळवून देणे. त्यासाठी त्यांना कौशल्याचे धडे देण्याचा उद्देश स्कूलचा आहे. त्यासाठी एमबीए रुरल मॅनेजमेंट, एम. टेक. रुरल टेक्नॉलॉजी, एमसीए रुरल इर्न्फोमेटिक, एमएसडब्ल्यू रुरल कम्युनिटी डेव्हलपमेंट, मास्टर आॅफ रुरल स्टडीज् असे पदव्युत्तर अभ्यासक्रम सुरू केले आहेत. त्यातील एमबीए., एम. टेक., एमसीए अभ्यासक्रम अखिल भारतीय तंत्रशिक्षण परिषदेची मान्यता घेऊन विकसित केले आहेत. उर्वरित अभ्यासक्रमांची रचना विद्यापीठ पातळीवर केली आहे. स्कूलमधील विविध अभ्यासक्रमांसाठी सध्या एकूण १८० विद्यार्थी-विद्यार्थिनी प्रवेशित आहेत. शिक्षक-शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांचे वेतन व इमारतीसाठी शासनाकडून निधीची मदत होत असल्याने देशातील अन्य विद्यापीठांच्या तुलनेत येथील अभ्यासक्रमांचे शुल्क कमी आहे. पश्चिम महाराष्ट्रातील शेती, ग्रामीण विकासाला बळ देण्याच्यादृष्टीने एक नवी दिशा या स्कूलच्या माध्यमातून विद्यापीठाद्वारे मिळाली आहे.तंत्रज्ञान विकासाचे कामदेशातील ४७ विद्यापीठांमध्ये ग्रामीण विकासाशी संबंधित अभ्यासक्रम आहेत, पण त्यांच्या तुलनेत शिवाजी विद्यापीठातील या स्कूलमधील अभ्यासक्रमांची रचना वेगळी आहे. अद्यावत तंत्रज्ञान शेतकऱ्यांच्या बांधापर्यंत पोहोचविण्यासह तरुणाईला रोजगाराची निर्माण करण्याबाबत कौशल्य विकासाचा समावेश केला आहे. सध्या स्कूलमध्ये ‘किचन वेस्ट’पासून ऊर्जानिर्मिती, प्लास्टिकपासून डिझेल निर्मितीबाबत तंत्रज्ञान विकसित करण्याबाबत संशोधन सुरू आहे.यशवंतराव चव्हाणांचे नाव का?विद्यापीठाच्या उभारणीत महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण यांचे महत्त्वपूर्ण योगदान राहिले. त्याबद्दल कृतज्ञता व्यक्त करण्याच्या उद्देशाने विद्यापीठाने सुवर्णमहोत्सवी वर्षांत त्यांच्या नावाच्या अध्यासनाचा प्रस्ताव शासनाला पाठविला. यावेळी चव्हाण यांची जन्मशताब्दी वर्ष असल्याने शासनाने स्कूलची मंजूर दिली. त्यावर विद्यापीठाने या स्कूलला ‘यशवंतराव चव्हाण स्कूल आॅफ रुरल डेव्हलपमेंट’ असे नाव दिले शिवाय त्यात अध्यासन समाविष्ट केले. स्कूलअंतर्गत पहिल्या टप्प्यात अभ्यासक्रम सुरू केले आहेत. टप्प्या-टप्प्याने स्कूलची व्याप्ती वाढविण्यात येणार आहे. त्यात शेतकरी तंत्रज्ञान, विपणन, प्रयोगशाळा, रुरल टेक्नॉलॉजी पार्क, शेतीविकासासह उत्पादनक्षमता सुधारण्याबाबत प्रक्रिया, संशोधनाचा समावेश केला जाणार आहे.- डॉ. व्ही. बी. जुगळे, (संचालक, यशवंतराव चव्हाण स्कूल आॅफ रुरल डेव्हलपमेंट)यशवंतराव चव्हाण जयंती विशेष
रोजगारनिर्मितीची विद्यापीठाकडून नवी दिशा--यशवंतराव चव्हाण जयंती विशेष
By admin | Published: March 11, 2015 10:27 PM