सोलापूर : कोरोनाबाधित (होम आयसोलेशन) लोकांना घरातून बाहेर काढून त्यांना कोविड सेंटर अथवा संबंधित नजीकच्या रुग्णालयात दाखल करण्यासाठी बीटस्तरावरील पोलीस कर्मचाऱ्यांसाठी चारचाकी अन् दुचाकी गाड्या पुरविल्या आहेत. लोकांच्या शोधासाठी ग्रामीण पोलीस दलाने ११० पथकांची नियुक्ती केली आहे. या पथकात आरोग्य विभाग, पोलीस, महसूल, जिल्हा परिषद व अन्य विभागांचाही सहभाग असल्याची माहिती सोलापूर ग्रामीण पोलीस दलाच्या पोलीस अधीक्षक तेजस्वी सातपुते यांनी ‘लोकमत’शी बोलताना दिली.
ग्रामीण भागातील कोरोना रुग्णांची संख्या कमी करण्यासाठी जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांनी पोलीस प्रशासनाला कडक कारवाईचे निर्देश दिले आहेत. यासोबत ग्रामीण भागात होम आयसोलेशन पूर्णत: बंद करण्यात आले आहे. घरीच उपचार घेणाऱ्या कोरोना रुग्णांचा शोध आणि माहिती गोळा करण्याचे काम गस्ती पथकाद्वारे होत आहे. एका बीट अंमलदाराकडे २५ ते ३० गावे असतात. बीट अंमलदारास प्रत्येक गावात जाऊन त्यांना घराबाहेर काढण्याचे काम पोलिसांना करावे लागत आहे, त्यासाठी वाहनांची व्यवस्था करण्यास बीटस्तरावरील पोलीस कर्मचाऱ्यांना प्रत्येक गावात जाणे महत्त्वाचे असल्याने त्यास वाहनांची आवश्यकता होती, त्यामुळे ग्रामीण पोलिसांनी जवळपास १०८ नवे वाहने उपलब्ध करून दिली आहेत.
गावातील कोविड सेंटरमध्ये रुग्णांवर होणार उपचार
जवळपास चार हजार रुग्ण होम आयसोलेशन अंतर्गत उपचार घेत होते. यापुढे होम आयसोलेशन पूर्णत: बंद करण्यात येणार आहे. प्रत्येक गावात कोविड केअर सेंटर सुरू होत आहे. त्यामुळे गावातीलच कोविड केअर सेंटरमध्ये रुग्णांना उपचार घेता येईल. रुग्णांनी प्राथमिक अवस्थेतच उपचार केंद्रात दाखल व्हावे असे आवाहन ग्रामीण पोलिसांनी केले आहे.
एकाच दिवसात २४०० लोकांना काढले बाहेर
होम आयसोलेशनमधील लोकांना घरातून बाहेर काढून आता संबंधित कोविड सेंटर अथवा नजीकच्या रुग्णालयास दाखल करण्यात येत आहे. सोमवारी ग्रामीण पोलिसांनी महसूल, जिल्हा परिषदेचे आरोग्य पथक व अन्य विभागांची मदत घेऊन एका दिवसात २४०० लोकांना घरातून बाहेर काढून उपचारासाठी रुग्णालयात हलविले आहे.
---------------
होम आयसोलेशनमधील लोकांना घराबाहेर काढून कोविड सेंटर अथवा नजीकच्या रुग्णालयात उपचारासाठी हलविण्याचे काम सुरू आहे. ११० पथकांची नियुक्ती करून बीटस्तरावरील पोलीस अधिकारी व कर्मचाऱ्यांना नव्याने १०८ गाड्या दिल्या आहेत. होम आयसोलेशनमधील लोक उपचारासाठी कोविड सेंटरमध्ये दाखल झाल्यास कोरोनाचा प्रसार नक्कीच थांबेल.
- तेजस्वी सातपुते,
पोलीस अधीक्षक, सोलापूर ग्रामीण