सोलापूर : क्रिकेटच्या २० रुपयांच्या बक्षिसावरून झालेल्या वादात रिक्षा, जीपवर दगडफेक करून दोन पोलिसांसह पाच जणांना जखमी केल्याप्रकरणात एमआयडीसी पोलीस ठाण्यात तीन वेगवेगळे गुन्हे दाखल करण्यात आले असून, यातील १९ आरोपींना अटक करण्यात आली आहे तर आणखी पाच जण फरार आहेत.रिक्षाचालक मैनोद्दीन शेख (रा. अंबिकानगर) यांनी दिलेल्या फिर्यादीवरून प्रीतम म्हेत्रे (२२, काडादीनगर), सोमनाथ कोळी (२९, म्हेत्रे वस्ती), अमितकुमार मंद्रुपकर (२३), सुनील यादव (४२, विष्णूनगर), गुरुसिद्धप्पा कुंभार (३९, म्हेत्रेनगर), अप्पाराव कुंभार (१९), अर्जुन कय्यावाले (२४, महाराणा प्रताप झोपडपट्टी), बबलू शिवशिंगवाले (३२, शिवगंगानगर), अशोक म्हेत्रे (२८, कुमठा नाका) या दहा जणांना बेकायदा जमाव जमवून मारहाण व रिक्षाची तोडफोड केल्याचा गुन्हा दाखल करून अटक करण्यात आली. त्यांना शुक्रवारी दुपारी न्यायालयासमोर हजर केल्यावर न्यायदंडाधिकारी बी. टी. झिरपे यांनी जामीन मंजूर केला. आरोपींतर्फे अॅड. विद्यावंत पांढरे, संदेश बनसोडे यांनी काम पाहिले. यातील आरोपी अमितकुमार व त्याच्या गल्लीत राहणारा सद्दाम शेख यांच्यात क्रिकेटच्या २० रुपयांच्या बक्षिसावरून गुरुवारी सायंकाळी भांडण झाले. सद्दाम व त्याच्या मित्रांनी अमितकुमार याला शिवीगाळ करून चापट मारली. यावरून सायंकाळी साडेसात वाजता आरोपींनी नई जिंदगीकडून कुमठा नाक्याकडे जाणारी रिक्षा अडवून दगडफेक केली. यात रिक्षाचालक व उमर शेख हे जखमी झाले.या प्रकारानंतर रात्री आठ वाजता नई जिंदगी चौकात आनंद पुजारी (रा. अशोक चौक) याची सुमो अडवून दगडफेक करण्यात आली. यात पुजारी व त्याचा भाऊ हे दोघे इंजीन आणण्यासाठी कुमठा नाक्याकडे सुमो घेऊन निघाले होते. पारशी विहिरीसमोर रिक्षा फोडल्यावरून जमावाने दगडफेक केली. यात आनंद, संतोष कय्यावाले हे गंभीर जखमी झाले. याप्रकरणी मुझफ्फर पठाण (शिवगंगानगर), दावलमलिक शेख (कुसूर, दक्षिण सोलापूर), नबीलाल शेख (जुना कुमठा नाका), मैनोद्दीन शेख (अंबिकानगर), निजामोद्दीन शेख, आरिफ शेख, नूरअब्दुल इनामदार (हुच्चेश्वरनगर), जहीर मुख्तार शेख (शिवगंगानगर) या आठ जणांना अटक करण्यात आली तर अताउल्ला शेख, जमीर शेख उर्फ बॉबी, सैफन शेख, सद्दाम शेख, फय्याज शेख हे फरार आहेत. अटक आरोपींना पो. नि. खाडे यांनी शुक्रवारी दुपारी न्यायालयासमोर हजर केले. फरार आरोपींचा शोध घेण्यासाठी आरोपींना पोलीस कोठडीची पोलिसांनी मागणी केली. न्यायदंडाधिकारी पाटील यांनी आरोपींना ९ जूनपर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचा आदेश दिला. यात आरोपींतर्फे अॅड. अब्बास काझी, अॅड. जहीर सगरी, अॅड. अहमद काझी, अॅड. अजमोद्दीन शेख हे काम पाहत आहेत. -----------------------------------पोलिसांची धावपळदगडफेकीत आनंद पुजारी याच्या डोक्याला गंभीर इजा झाली असून, शासकीय रुग्णालयातील ट्रॉमा केअर युनिटमध्ये उपचार सुरू आहेत. पुजारी हमालीचे काम करीत असून आर्थिक परिस्थिती हलाखीची आहे. त्याच्या घरच्यांकडे औषधासाठी पैसे नव्हते. पोलिसांनी पैसे दिले व डॉ. काटीकर यांना उपचारासाठी विनंती केली. -----------------------------------------पोलीस काय करीत होतेसोलापुरात तीन दिवसांपासून पोलीस बंदोबस्त लागला आहे. नई जिंदगी चौकात पो. नि. खाडे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस बंदोबस्त होता. या ठिकाणापासून हाकेच्या अंतरावर हा प्रकार घडला. स्ट्रायकिंग फोर्स पोहोचला तरी घटनास्थळावरचा बंदोबस्त हलला नव्हता.
नई जिंदगी: दगडफेक; १९ जणांना अटक
By admin | Published: June 07, 2014 1:02 AM