सोलापूर : स्मार्ट सिटी योजनेची बहुचर्चित उजनी ते सोलापूर दुहेरी पाईपलाईनच्या कामाची ३५९ कोटी रुपयांची सहाव्यांदा काढण्यात आलेली निविदा अखेर देशातील तीन बड्या कंपन्यांनी ३० ते ३२ टक्के जादा दराने भरली आहे. हे जादा ९० ते १०० कोटी रुपये कुठून उभारायचे, यावर स्मार्ट सिटी कंपनीच्या अधिकाºयांमध्ये खल सुरू आहे.
उजनी ते सोलापूर दुहेरी पाईपलाईनच्या कामाची निविदा पहिली निविदा १५ नोव्हेंबर २०१८ ला काढण्यात आली होती. तीनवेळा मुदतवाढ दिल्यानंतर एकाही कंपनीने रस दाखविला नाही. त्यामुळे १७ जानेवारीला पुन्हा फेरनिविदा काढण्यात आली. पहिल्या फेरीत एका कंपनीने रस दाखविला. त्यामुळे दोनदा मुदतवाढ देण्यात आली. तिसºयांदा जाहीर झालेली निविदा भरण्यास १८ फेब्रुवारी ही अखेरची मुदत होती. यावेळेस तीन कंपन्यांनी निविदा भरली.
या कंपन्यांचा तांत्रिक लिफाफा (टेक्निकल बीड) २० फेब्रुवारीला जीवन प्राधिकरणकडे पाठविण्यात आला. या तीनही कंपन्या निविदेसाठी पात्र असल्याचे जीवन प्राधिकरणाच्या अधीक्षक अभियंत्यांनी स्पष्ट केले. त्यानंतर २६ फेब्रुवारी वित्तीय लिफाफा (फायनान्शिअल बीड) खुला करण्यात आला. त्यात तीन कंपन्यांनी मंजूर दरापेक्षा ३० ते ३२ टक्के जादा दराने निविदा भरल्याचे स्पष्ट झाले. या कामासाठी एनटीपीसीने २५० कोटी तर स्मार्ट सिटी कंपनीने २०० कोटी असे एकूण ४५० कोटी रुपये मंजूर केले आहेत. स्मार्ट सिटी कंपनीने या मंजूर निधीतून ३५९ कोटी ९ लाख रुपयांच्या कामाची निविदा काढली होती. उर्वरित निधी ९० कोटी रुपयांचा निधी हा राष्ट्रीय महामार्ग, रेल्वे क्रॉसिंगच्या ठिकाणाचे काम आणि प्रकल्प सल्लागार असलेल्या जीवन प्राधिकरणाच्या फीसाठी राखीव ठेवण्यात आला आहे.
वाटाघाटीसाठी होणार बैठक च्निविदा भरणाºया कंपन्यांमध्ये पोचमपॅड कन्स्ट्रक्शन, हैदराबाद -(४६४ कोटी), एनसीसी कन्स्ट्रक्शन, हैदराबाद - (४७२ कोटी) आणि कोया कन्स्ट्रक्शन, हैदराबाद - (४८२ कोटी) अशा पद्धतीने रक्कम मागितलेली आहे. यातील पोचमपॅड कन्स्ट्रक्शन कंपनीची सर्वात कमी दराची निविदा आहे. या कंपनीने कामाचे दर आणखी कमी करावेत यासाठी स्मार्ट सिटी कंपनीचे चेअरमन असीम गुप्ता आणि इतर वरिष्ठ अधिकाºयांसमवेत बैठक होणार आहे.
आठ वर्षांपासून खल, आता १०० कोटींचा प्रश्न- उजनी ते सोलापूर दुहेरी पाईपलाईन ही अतिशय महत्त्वाकांक्षी योजना आहे. सोलापूर शहराचा पुढील ३० वर्षांचा पाणीपुरवठ्याचा ताण लक्षात घेऊन ही योजना प्रस्तावित करण्यात आली आहे. गेल्या आठ वर्षांपासून या योजनेवर खल सुरू आहे. - एनटीपीसीने निधी मंजूर केल्यानंतर ही योजना मार्गी लागणे अपेक्षित होते, परंतु त्यातही वेळ गेला. आता स्मार्ट सिटी कंपनीने २०० कोटींचा निधी मंजूर केला. कामाची निविदा मंजूर होण्यापूर्वीच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते या कामाचे भूमिपूजन झाल्याचे जाहीर करण्यात आले. आता निविदा मंजुरीची वेळ आली असताना नव्याने ९० ते १०० कोटी रुपये कोठून उभारायचे, असा नवा पेच निर्माण झाला आहे.
पाईपचे दर वाढल्याचा परिणाम : दुलंगे- मनपाचे सार्वजनिक आरोग्य अभियंता गंगाधर दुलंगे म्हणाले, जीवन प्राधिकरणाने दिलेल्या प्रकल्प अहवालानुसार उजनी ते सोलापूर पाईपलाईनच्या कामाचा ३५९ कोटी रुपयांचा आराखडा तयार करण्यात आला. त्याच दरानुसार निविदा काढण्यात आली. पण मध्यंतरीच्या काळात लोखंडी पाईपचे दर वाढले. त्यामुळे कंपन्यांनी जादा दराने निविदा भरली आहे. आता नव्याने पैसा कसा उभारायचा याची निश्चितता होईल. प्रश्न मार्गी लागेल.