बार्शीची बाजार समिती भुसार मालाच्या आवकासाठी राज्यात प्रसिद्ध आहे. येथे बार्शी, माढा, करमाळा सोबतच उस्मानाबाद जिल्ह्यातील भूम,परांडा, वाशी, कळंब आदी तालुक्यातील शेतमाल विक्रीसाठी येतो. खरीप हंगामात तालुक्यात व परिसरात मोठ्या प्रमाणात सोयाबीन व उडीदाची पेरणी झाली आहे. त्यामुळे सुरुवातीला पेरणी झालेल्या उडीद काढणी सुरू झाली आहे. बुधवारी बाजारात ४,२०० कट्टे आवक झाली होती. कमीत कमी ४,५०० तर मध्यम मालाला ६,५०० आणि चांगल्या मालाला ७,३५० रुपये प्रति क्विंटल दर मिळत असल्याचे बाजार समितीचे चेअरमन रणवीर राऊत यांनी सांगितले.
मागील दोन वर्षापूर्वी ही बाजारात उडदाची विक्रमी आवक होऊन बाजारात पाय ठेवायला जागा नव्हती अशी परिस्थिती निर्माण झाली होती. यासोबतच पुढील महिन्यात सोयाबीनची काढणी सुरू होईल व त्यानंतर सोयाबीनची आवक सुरू होईल, असे सचिव तुकाराम जगदाळे यांनी सांगितले.
----
अन्य पिकांची ही आवक
यासोबतच ज्वारीची ही सात ते आठ हजार कट्टे आवक आहे. हलक्या प्रतिच्या ज्वारीला १३०० तर मध्यम २५०० आणि उच्च दर्जाचे ज्वारीला २५०० रुपये रुपये दर मिळत आहे. हरभरा आवक ही शंभर कट्ट्यावर असून ४,४०० ते ४,६०० रुपये दर आहे. गव्हाची सव्वाशे कट्टे आवक असून, १,७००-१,९०० आणि २,७०० दर आहे. खरीप हंगामातील मूग ही बाजारात दाखल झाला आहे. मुगाची ८० कट्टे आवक असून दर ५८०० ते ६५०० रुपये मिळत आहे. या आठवड्यात उडीदाची आवक मोठ्या प्रमाणात वाढण्याची शक्यता आहे.