ही घटना आहे मंद्रुप येथील. प्रवीण देशपांडे हे मंद्रुप येथील बडे प्रस्थ. काही दिवसांपूर्वी त्यांना कोरोनाचा संसर्ग झाला. सोलापूरच्या खासगी रुग्णालयात दाखल केले. याचदरम्यान त्यांचा मंद्रुप येथील सहकारी श्यामराव उर्फ अन्नू शेंडगे यांनाही त्यांच्याच रूममध्ये दाखल करण्यात आले. शेंडगे आणि देशपांडे यांच्यात मैत्री आणि नेता- कार्यकर्ता असे नाते होते. दोघांनी मनसोक्त गप्पा मारल्या आणि रात्री देशपांडे यांना डिस्चार्ज मिळाला.
दोनच दिवसात अन्नू शेंडगे यांच्या मृत्यूची खबर प्रवीण देशपांडे यांना मिळाली. हा धक्का त्यांना पचवता आला नाही. मित्र आणि कार्यकर्ता असलेल्या अन्नू शेंडगे यांच्या आठवणीमुळे त्यांना त्रास जाणवू लागला.
देशपांडे यांना लिव्हरवर उपचारासाठी पुण्यात दाखल करण्यात आले. दोनच दिवसात त्यांचा मृत्यू झाला. या घटनेने मंद्रुप परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे. प्रवीण देशपांडे यांचा जनसंपर्क दांडगा होता. दिलीप माने यांचे ते खंदे समर्थक म्हणून ओळखले जात होते. भीमा-सीना खोऱ्यात त्यांच्या नावाचा दबदबा होता.
-------
संवेदनशीलतेने ओढवले संकट
मंद्रुप येथील एका सहकाऱ्याचा पंधरा दिवसांपूर्वी कोरोनाने मृत्यू झाला. त्याच्या अंत्यविधीला जाता आले नाही म्हणून प्रवीण देशपांडे सपत्नीक मृताच्या कुटुंबीयांना भेटण्यासाठी गेले. मृताच्या भावाने गळ्यात पडून दुःख मोकळे केले आणि त्याचाच फटका देशपांडे यांना बसला. दुसऱ्या दिवशी त्यांची टेस्ट पॉझिटिव्ह आल्याने रुग्णालयात दाखल करावे लागले
------
मित्राच्या धक्क्यातून सावरले नाहीत;
चार दिवसांपूर्वी भाऊ गेला
रुग्णालयात उपचार घेत असताना देशपांडे यांचे बंधू प्रदीप यांचे चार दिवसांपूर्वी हृदयविकाराच्या धक्क्याने निधन झाले होते. त्यांच्या सासू दोन दिवसांपूर्वी गुलबर्ग्यात कोरोनाने गेल्या. ही बातमी प्रवीण देशपांडे यांच्यापासून लपवून ठेवली होती; पण कार्यकर्ता अन्नू शेंडगे यांच्या निधनाची बातमी लपून राहिली नाही. वर्षभरात मोठा भाऊ प्रदीप यांचा कोरोनाने बळी गेला. अन्य एका भावाच्या पत्नीचे निधन झाले. या धक्क्यातून सावरत असताना मित्राच्या धक्क्यातून ते सावरू शकले नाहीत.
-----
१०प्रवीण देशपांडे
१०श्यामराव शेंडगे