पंढरपुरात स्थानिक उमेदवारच; मात्र भगीरथ भालकेंचे नाव नाही
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 28, 2020 05:44 PM2020-12-28T17:44:36+5:302020-12-28T18:06:53+5:30
पंढरपूर-मंगळवेढा मतदारसंघातून पार्थ पवार यांच्या उमेदवारीचे वृत्त निराधार; उपमुख्यमंत्री अजित पवार यांची स्पष्टोक्ती
मुंबई/सोलापूर :- पंढरपूर-मंगळवेढा मतदारसंघातून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातर्फे पार्थ पवार यांना उमेदवारी देण्यात येणार असल्याचे वृत्त पूर्णपणे निराधार असून त्यामध्ये कोणतेही तथ्य नाही. या मतदारसंघात उमेदवारी देताना स्थानिक कार्यकर्त्यांच्या भावना आणि महाविकास आघाडीच्या घटक पक्षांचे मत विचारात घेऊन अंतिम निर्णय घेण्यात येणार आहे. त्यामुळे पार्थ पवार यांना उमेदवारी देण्यात येणार असल्याचे तथ्यहीन वृत्त माध्यमांनी थांबवावे, असे आवाहन उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केले आहे.
पंढरपूर-मंगळवेढा मतदारसंघाचे राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार भारत भालके यांच्या निधनाने रिक्त झालेल्या विधानसभेच्या जागेवर पार्थ पवार यांना उमेदवारी देण्यात येणार असल्याच्या बातम्या गेल्या काही दिवसांपासून माध्यमांमध्ये येत आहेत. या बातम्यांना कोणताही आधार नाही. भारतनाना भालकेंचे निधन हा आमच्यासाठी मोठा धक्का असून स्थानिक कार्यकर्त्यांच्या भावना आणि महाविकास आघाडीतील घटक पक्षांशी विचार-विनिमय करुनच या पोटनिवडणुकीसाठी स्थानिक उमेदवार देण्यास प्राधान्य असणार आहे.
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा उमेदवार ठरविण्याचा निर्णय पक्षाचे प्रदेशाध्यक्ष व उमेदवार निवड समितीच्या माध्यमातून घेण्यात येईल. महाविकास आघाडी सरकार स्थापन झाल्यापासून ही पहिलीच विधानसभा पोटनिवडणूक असून महाविकास आघाडीचा उमेदवार प्रचंड मताधिक्याने विजयी होईल, असा विश्वासही उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी व्यक्त केला आहे.