सोलापूर : लाठी-काठी या पारंपरिक कलेला आता खेळाचा दर्जा मिळाला असून या खेळात सोलापुरातील सौंदर्या नरेंद्र यल्ला हिने उत्कृष्ट कामगिरी केली असून २८ व २९ मे रोजी नेपाळमधील काठमांडू येथे होणाऱ्या आंतरराष्ट्रीय लाठीकाठी स्पर्धेत सौंदर्याची निवड झाली आहे. स्पर्धेत सोलापुरी डंका वाजवण्यासाठी सौंदर्या काठमांडूला रवाना झाली आहे. तिचे वडील वृत्तपत्र विक्रेता आणि आई विडी कामगार तर मुलगी आंतरराष्ट्रीय लाठीकाठी स्पर्धेत सोलापुरी कर्तृत्व गाजवणार..! तिच्या या यशाबद्दल सोलापुरातील अनेकांनी तिचे कौतुक केले आहे.
सौंदर्या ही सावित्रीबाई फुले इंग्लिश मीडियम स्कूलमध्ये इयत्ता सहावीची विद्यार्थिनी आहे. सौंदर्यासोबत सोलापुरातून एकूण पंधरा मुले काठमांडूला रवाना झाली आहेत. सौंदर्याचे वडील नरेंद्र हे वृत्तपत्र विक्रेते असून ते लष्कर येथील गांधीनगर परिसरातील रहिवासी आहेत. अलीकडच्या काळात मुलींवर आणि महिलांवर मोठ्या प्रमाणात अत्याचार होत आहेत. समाजात महिला असुरक्षित आहेत. या पार्श्वभूमीवर महिलांना स्व-संरक्षणाचे प्रशिक्षण मिळाले पाहिजे, या विचाराचे यल्ला हे समर्थक आहेत. स्वसंरक्षणासाठी लाठीकाठी कला ही सर्वोत्तम कला आहे. नरेंद्र यांनी त्यांच्या एकुलत्या एका मुलीला लाठी-काठी कलेचे प्रशिक्षण द्यायला प्रोत्साहन दिले. विकास नगर येथील शिवराम भोसले यांच्याकडे लाटीकाठीचे क्लासेस सुरू केले. अवघ्या चार ते पाच महिन्यांत सौंदर्या यात निपुण झाली आणि आंतरराष्ट्रीय स्पर्धेसाठी तिची निवड झाली आहे.
मान्यवरांकडून सत्कार
सौंदर्याच्या यशाबद्दल वृत्तपत्र विक्रेता संघटनेचे अध्यक्ष शिवलिंग मेढेगार, नागनाथ माडगुंडी, प्रभाकर पोद्दार तसेच डॉग आर्टिकल्स कॉर्नरतर्फे तिचा सत्कार करण्यात आला. यावेळी श्रीरंग केंगार, बोधले साहेब, पशू चिकित्सक दत्तात्रय केंगार आदी उपस्थित होते.