टाकीतील पेट्रोल अंगावर पडून पती-पत्नी जखमी
बार्शी : घरासमोर लावलेल्या दुचाकीला अज्ञात इसमांनी पेटवून पळ काढला. शांत रात्रीच्या वेळी आवाजाने जागी झालेले पती-पत्नी बाहेर आले. आणि नेमके त्याचवेळी पेटलेल्या दुचाकीच्या टाकीचे टोपण उंच उडाले. आणि आतील पेट्रोल अंगावर उडून दोघेही भाजले. ही दुर्दैवी घटना २ एप्रिलच्या रात्री पहाटे आझाद चौकातील खुडे बोळात घडली.
रामचंद्र जगन्नाथ ढोले (वय- ४४, आझाद चौक, बार्शी) व ज्योती रामचंद्र ढोले अशी जखमींची नावे आहेत. या प्रकरणी रामचंद्र ढोले यांच्या फिर्यादीनंतर बार्शी शहर पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदला आहे.
पोलिसांनी दिलेल्या महितीनुसार यातील जखमी रामचंद्र हे एका खाजगी कंपनीत व्यवस्थापक म्हणून काम करत आहेत. त्यांना कंपनीने जाण्यायेण्यासाठी (एमएच १३ सीआर ३४२३) दुचाकी दिली आहे. नेहमीप्रमाणे ते काम आटोपून घरी आले. दुचाकी नेहमीच्या ठिकाणी घराबाहेर पार्क केली. रात्री जेवण आटोपून झोपी गेले. पहाटेच्या सुमारास जळण्याचा वास आणि आवाजाने ते जागे झाले. घराबाहेर पती-पत्नी आले असता समोर गाडी पेटल्याचे दिसले. नेमके काही समजण्याच्या अगोदरच पेट्रोल टाकीचे टोपण उडाले. आतील पेट्रोल उडून रामचंद्र आणि ज्योती ढोले यांच्या मानेवर जळते पेट्रोल उडाले. यात दोघेही भाजले.
आवाजाने शेजारी असलेले भाऊ भालचंद्र ढोले, संतोष खुडे, विद्या खुडे मदतीला धाऊन आले. त्यांनी जखमी दोघांना खासगी दवाखान्यात दाखल केले. असूून या प्रकरणी अधिक तपास पोलिस नाईक गणेश वाघमोडे करत आहेत.