सोलापूर : राज्याचे मुख्य सचिव सीताराम कुंटे यांनी शुक्रवारी सर्व विभागीय आयुक्त व जिल्हाधिकाऱ्यांची व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे बैठक घेऊन कोरोना लॉकडाऊनवरील निर्बंध कडक करण्याच्या सूचना दिल्या आहेत. या पार्श्वभूमीवर सोलापूर जिल्हा प्रशासनाकडून रात्रीची संचारबंदी कडक करण्याची तयारी सुरू आहे. याच पार्श्वभूमीवर ३१ मार्चपर्यंत शाळा बंद राहण्याची शक्यता आहे. याबाबतचा प्रस्ताव प्रशासनाने तयार केला असून, पालकमंत्री दत्तात्रय भरणे यांच्याशी चर्चा केल्यानंतर पुढील कडक उपाययोजना जाहीर होतील, असे जिल्हा प्रशासनातील अधिकाऱ्यांनी सांगितले.
शहर व जिल्ह्यात कोरोना रुग्णांच्या संख्येत वाढ होत आहे. मृत्यूच्या संख्येतही वाढ होत आहे. कोरोना प्रतिबंधक उपाययोजनांची अंमलबजावणी नागरिकांकडून होईना. त्यामुळे प्रशासनाने सोमवार, १५ मार्चपासून रात्रीच्या संचारबंदीच्या वेळेत वाढ करण्याबरोबरच निर्बंधही कडक करण्याचा प्रस्ताव तयार केला आहे. सोमवार १५ मार्च रोजी जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर हे महापालिका, जिल्हा परिषद, आरोग्य विभाग आणि पोलीस प्रशासनातील वरिष्ठ अधिकाऱ्यांची बैठक घेऊन कडक निर्बंधाच्या अंमलबजावणीबाबत अंतिम निर्णय घेतील. त्यानंतर पालकमंत्र्यांशी चर्चा करून निर्णय जाहीर करतील.
वाहतूक बंद ठेवण्याचा विचार
सोलापुरात रुग्ण वाढत आहेत. या पार्श्वभूमीवर सोलापूर शहर व जिल्ह्यात कडक निर्बंध घालण्यात येणार आहेत. रात्रीच्या संचारबंदी वेळेत वाहतूकही बंद ठेवण्याचा विचार सुरू आहे. शहरातील उद्याने, हॉटेल, बियर बार व अन्य गर्दीच्या ठिकाणी कडक निर्बंध लादण्यात येणार आहेत.
चाचण्या वाढविणार
अपर जिल्हाधिकारी संजीव जाधव यांनी सांगितले, मुख्य सचिव सीताराम कुंटे यांनी चाचण्या वाढविण्याची सूचना केली असून, त्यानुसार चाचण्यांची संख्या वाढविण्यात येणार आहे. यासाठी नवीन ‘आरटीपीसीआर’ मशीन घेण्यात येत असून, ही मशीन दाखल झाल्यानंतर चाचण्यांची संख्या दुपटीने वाढेल. सध्या दिवसाला एक हजार ते बाराशे चाचण्या केल्या जात आहेत. नवीन मशीन आल्यानंतर चाचण्यांची संख्या दोन हजारांवर जाईल.