सोलापूर : सोलापूर महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त विजय खोराटे यांची पुणे महानगरपालिकेत अतिरिक्त आयुक्तपदी बदली झाल्यानंतर त्यांच्या जागी सासवड नगर परिषदेचे (जिल्हा - पुणे) मुख्याधिकारी निखिल बाजीराव मोरे यांची पदोन्नतीने महापालिकेच्या अतिरिक्त आयुक्तपदी नियुक्ती केली आहे. तसे आदेश नगर विकास विभागाच्या अधिकाऱ्यांनी काढले आहेत.
सोलापूर महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त विजय खोराटे यांना महापालिका आयुक्त शीतल तेली - उगले यांनी २१ जून २०२३ रोजी कार्यमुक्त केले होते. त्यानंतर ती जागा रिक्त होती. अखेर महाराष्ट्र शासनाच्या नगर विकास विभागाच्या उपसचिव प्रियांका कुलकर्णी - छापवाले यांच्या सहीने मोरे यांना पदोन्नतीने सोलापूर महानगरपालिकेच्या अतिरिक्त आयुक्तपदी बदली केली आहे.
मागील काही दिवसांपासून अतिरिक्त आयुक्त पद रिक्त होते. निखिल मोरे हे लवकरच अतिरिक्त आयुक्त पदाचा पदभार घेणार असल्याचे सांगण्यात आले. आता त्यांच्याकडे कोणत्या कोणत्या विभागाची जबाबदारी आयुक्त शितल तेली-उगले देणार याकडे आता लक्ष लागले आहे.