बार्शी : युनेस्को व लंडन येथील वारकी फाउण्डेशनचा जागतिक शिक्षक पुरस्कार मिळाल्याबद्दल रणजितसिंह डिसले यांच्या अभिनंदनाचा प्रस्ताव विधान परिषद सभापती रामराजे निंबाळकर यांनी मांडला. यावर उपसभापती ना.डॉ. नीलम गोऱ्हे यांनी डिसले यांचे प्रथम अभिनंदन केले.
त्यांचे काम समाजात आदर्शवत व प्रेरणादायी आहे. परितेवाडीसारख्या गावात राहून डिसले गुरुजींनी नवीन तंत्रज्ञानाचा वापर शिक्षणात केल्यामुळे विद्यार्थ्यांना शिकण्याची गोडी लागली आहे. क्यूआर कोडचा सकारात्मक वापरला आहे. शालेय पुस्तकामध्ये याचा वापर झाल्याने या नावीन्यपूर्ण प्रयोगाने विद्यार्थी शिक्षणात रुची घेऊ लागले आहेत. या पुरस्कारातील निम्मी रक्कम उर्वरित देशातील मुलांच्या शिक्षणासाठी देऊन दातृत्वाची पायरी जगाला दाखवून भारत मातेच्या संस्काराची ओळख सर्वांना दिल्याबाबतही डिसले यांचा अभिमान असल्याचे सांगितले. डिसले यांना कोरोना लागण झाली असल्याचे सांगत असताना गोरे म्हणाल्या, त्यांच्या तब्येतीची काळजी उपसभापती कार्यालयाच्या वतीने घेतली जात आहे. त्यांची तब्बेत आता सुधारत असल्याचे त्यांनी सांगितले.