सोलापूर : एचआयव्ही संसर्ग झाल्यानंतर जीवनाविषयी निराश न होता. आजारातून बरे होण्याची उमेद कायम ठेऊन १७० बाधित जोडपे मोठ्या उत्साहाने वधू - वर मेळाव्या आले. संकल्प युथ फाऊंडेशनने खास व्हॅलेन्टाईन दिनी आयोजित केलेल्या या उपक्रमात नऊ जोडप्यांनी आपले जीवनसाथी निश्चित करून थोरा - मोठ्यांचे सहकार्याने विवाह निश्चित केले.
अवंती नगर येथील प्रसन्न बहुउद्देशीय सभागृहात आयोजित करण्यात आलेल्या या आगळ्या वेगळ्या वधू-वर परिचय मेळाव्याचे उद्घाटन जिल्हा सरकारी वकील प्रदीपसिंह राजपूत यांच्या हस्ते करण्यात आले. या कार्यक्रमाला विजापूर नाका पोलीस चौकीचे पोलीस निरीक्षक कैलास काळे,युवा उद्योजक नितीन अरतानी, सोलापूर बार असोसिएशनचे अध्यक्ष संतोष न्हावकर,प्रसन्न नाझरे,मुख्य संयोजक अॅड. बसवराज सलगर, संस्थेचे अध्यक्ष किरण लोंढे आदी उपस्थित होते.
या मेळाव्यासाठी बुलढाणा, नांदेड, कोल्हापूर, मुंबई, पुणे, नाशिक,चंद्रपूर, गडचिरोली याचबरोबर महाराष्ट्राच्या बाहेरीलही युवक-युवती सहभागी झाले होते. यामध्ये १२0 युवक व ५0 युवती सामील झाल्या होत्या. या मेळाव्यातून ९ विवाह जमले आहेत. यावेळी प्रदीपसिंग राजपूत यांनी मेळाव्याचे कौतुक केले. अशा प्रकारचा मेळावा महाराष्ट्रात कुठेच भरला जात नाही.सोलापुरातील हा उपक्रम खूप महत्त्वाचा आहे. संकल्प युथ फाउंडेशन या संस्थेचे हे काम अत्यंत कौतुकास्पदच आहे असे प्रतिपादन त्यांनी केले.
संतोष न्हावकर म्हणाले, हे कार्य करताना आणि अशा असामान्य लोकांना एकत्र आणताना खूप अडचणींना सामोरे जावे लागत असेल,या अडचणी दूर करून संकल्प फाउंडेशनच्या टीमने केलेले काम हे खरंच कौतुकास्पद आहे असे सांगितले. हा उपक्रम यशस्वी करण्यासाठी प्रमोद खांडेकर ,नितीश फुलारी, ओंकार साठे,पूजा काटकर, श्रद्धा राऊळ, रोहित दुगाणे,सूरज भोसले,सागर देवकुळे, सोनू कसबे,आकाश धोत्रे,योगिनी दांडगे, अशपाक नदाफ आदींनी परिश्रम घेतले.
आंतरजातीय विवाह...- या वधू - वर मेळाव्यात सर्वजण जातीची उतरंड मोडून सहभागी झाले होते. जीवघेण्या आजाराने बाधित झालोे असलो तरी जगण्याची एक तरी संधी मिळेल, हा आशावाद त्यांच्या ठायी कायम होता. बंधनं कोणतीच नव्हती, जात तर त्यांच्या मनाला शिवतही नव्हती. त्यामुळे बाधितांच्या या मेळाव्यात जी नऊ लग्न ठरली. त्यातील सात जोडप्यांनी आंतरजातीय विवाह करण्याला पसंती दिली.