अक्कलकोट : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर अक्कलकोट तालुक्यात घालून दिलेल्या नियमांचे उल्लंघन करणाऱ्या २ हजार ६२६ जणांवर कारवाई करण्यात आली आहे. त्यांच्याकडून ९ लाख ४४ हजार रुपयांचा दंड वसूल करण्यात आला आहे. ही कारवाई उपविभागीय पोलीस अधिकारी डॉ. संतोष गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली.
राज्यात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत चालला आहे. अक्कलकोट उत्तर ठाणे आणि अक्कलकोट दक्षिण पोलीस ठाणे या पोलीस ठाण्यांच्या अधिकाऱ्यांवर कारवाई करण्याच्या सूचना वरिष्ठांनी दिल्या होत्या. अक्कलकोट शहरात आणि ग्रामीण भागातील दुधनी, मैंदर्गी येथील मुख्य बाजारपेठेत सराफ दुकान, कापड दुकान, स्टेशनरी दुकान, भाजी विक्रेतेसह इतर घटकातील सर्वसामान्यांवर कारवाई करण्यात आली.
अक्कलकोट उत्तर पोलीस ठाण्याचे निरीक्षक कल्लप्पा पुजारी व दक्षिण पोलीस ठाण्याचे निरीक्षक विजय जाधव यांच्याकडून प्रबोधनाचे प्रयत्न होत आहेत. जानेवारी ते आजतागायत विनामास्क, सोशल डिस्टन्स, सार्वजनिक ठिकाणी थुंकणे, फेरीवाले यांच्यावर कारवाई केली आहे.
---
लाखोंचा दंड वसूल
अक्कलकोट उत्तर पोलीस ठाण्याकडून विना-मास्क (८८२ केसेस) , सार्वजनिक ठिकाणी थुंकणे (१९८ केसेस), सोशल डिस्टन्स न पाळणे (२५२ केसेस). फेरीवाले (२२ केसेस), चारचाकी वाहन (१ केस) अशी १ हजारे ३५१ केसेस करून ५ लाख, नऊ हजार रुपयांचे दंड वसूल करण्यात आला आहे. अक्कलकोट दक्षिण पोलीस ठाण्याच्या पथकाने विना मास्क (५८५ केसेस), सोशल डिस्टन्स न पाळणे व इतर ७३५ केसेस अशा एकूण १ हजार १३२ केसेस करून एकूण ४ लाख ३५ हजार रुपयांचे दंड वसूल केला आहे.