बार्शी : भरदिवसा एकट्या असलेल्या महिलेच्या घरात घुसून हातपाय बांधून दागिने चोरले आणि नऊ महिन्याच्या बालकाचा गळा आवळून खून केल्याप्रकरणी पोलिसात गुन्हा नोंदला आहे. पोलिसांनी तपासासाठी चार पथके रवाना केली आहेत. या प्रकरणी अद्याप कोणासही अटक झालेली नाही.
ही घटना शनिवारी दुपारी घडली. याबाबत मयत लहान बाळाचे चुलते आनंद राजेंद्र तुपे यांनी तालुका पोलिसात तक्रार देताच पोलिसांनी अज्ञात चोरट्यांविरुद्ध भादंवि ३०२ अन्वये गुन्हा नोंदला आहे.
या घटनेत सार्थक स्वानंद तुपे (वय नऊ महिने) या बाळाचा मृत्यू झाला तर त्याची आई अश्विनी तुपे ही जखमी झाली आहे. यातील तुपे कुटुंबीय वांगरवाडी येथील जिल्हा परिषद शाळेजवळ वास्तव्यास आहे. महिला अश्विनी हिची सासू-सासरे शेतामध्ये गेले होते. तर पती ट्रकचालक असून बाहेरगावी गेले होते. दीर आनंद तुपे कामानिमित्त बार्शीत होते. घरात अश्विनी होती. तिचा मोठा मुलगा बाहेर खेळण्यास गेला होता.
जखमी महिला सार्थकला पाळण्यात झोपवून घरात पीठ चाळत बसली असतानाच मुलाचा रडण्याचा आवाज येताच त्या पळत गेल्या. त्यावेळी एक चोरटा मोबाईल चार्जरच्या वायरने सार्थकचा गळा आवळत होता. त्यास अश्विनीने अडवून घरातील तुला काय पाहिजे ते घेऊन जा, पण माझ्या मुलाला मारू नको असे म्हणत तिला ढकलून दिले. लहान मुलाचा गळा आवळून मारून जमिनीवर टाकले. अश्विनीचे साडीने पाय बांधले व तोंडात बोळा कोंबून आवाज बंद करून कपाटातील अश्विनीचे १२ हजारांचे दागिने व गळ्यातील मणीमंगळसूत्र गळ्यातून ओढून चोरटा मक्याच्या शेतात पळून गेला.