सोलापूर : उजनी ते सोलापूर समांतर पाईपलाईनच्या कामाला अद्याप पूर्णपणे सुरुवात झालेली नाही. तोपर्यंतच कंत्राटदार कंपनीने या कामात तब्बल ५६ कोटी रुपये वाढवून द्यावेत, अशी मागणी स्मार्ट सिटी कंपनीकडे केली आहे. कंपनीच्या संचालक मंडळाने हा प्रस्ताव फेटाळून लावला आहे.
स्मार्ट सिटी कंपनीच्या संचालक मंडळाची वार्षिक बैठक सोमवारी दुपारी नियोजन भवनमध्ये झाली. कंपनीचे चेअरमन असीम गुप्ता पुन्हा गैरहजर होते. त्यामुळे अध्यक्षस्थान पोलीस आयुक्त अंकुश शिंदे यांनी भूषविले. यावेळी जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर, महापौर श्रीकांचना यन्नम, मनपा आयुक्त पी. शिवशंकर, स्मार्ट सिटीचे कार्यकारी संचालक त्रिंबक ढेंगळे-पाटील, उपमहापौर राजेश काळे, सभागृह नेता श्रीनिवास करली, विरोधी पक्षनेता महेश कोठे, कंपनीचे सल्लागार संचालक नरेंद्र काटीकर, चंद्रशेखर पाटील, मुख्य तांत्रिक अधिकारी संजय धनशेट्टी आदी उपस्थित होते.
समांतर जलवाहिनीचे ११० किमीचे अंतराचे ४६४ कोटी रुपयांचे कंत्राट हैदराबादच्या पोचमपाड कंपनीला दिले आहे. ऑगस्ट २०१९ मध्ये या कामाची निविदा काढण्यात आली होती. सध्या केवळ पाच किलोमीटरचे काम पूर्ण झाले आहे. पाईपचे दर वाढले, कामाला उशीर झाला म्हणून मूळ कंत्राटात ५६ कोटी रुपयांची वाढ करावी. तरच काम पुढे घेऊन जाता येईल अशा आशयाचे पत्र कंपनीने स्मार्ट सिटीच्या कंपनीला पाठवले. सोमवारच्या बैठकीत अचानक हे पत्र संचालक मंडळासमोर सादर करण्यात आले. कंत्राटामध्ये किंमत वाढीची कोणत्याही प्रकारची तरतूद नसल्याने हा प्रस्ताव फेटाळून लावा, असे जिल्हाधिकारी, मनपा आयुक्त, महापौर, विरोधी पक्षनेता यांच्यासह इतरांनी सांगितले. तूर्तास हे पत्र बाजूला ठेवले असले तरी कंपनीचे लोक कामाची किंमत वाढविण्यावर ठाम आहेत.
यापूर्वीच कंपनीचे ओझे हलके केले होते
पोचमपाड कंपनीने पूर्वीच हे काम जादा किमतीला मागितले होते. महापालिका आर्थिक अडचणीत आहे, स्मार्ट सिटीने इतर प्रकल्पात तरतूद संपली आहे. त्यामुळे स्मार्ट सिटीच्या अधिकाऱ्यांनी मूळ कंत्राटातील होटगी स्टेशन, फताटेवाडी, आहेरवाडी येथील पाणीपुरवठा योजनेचे काम बाजूला काढले. इतर कामेही करून पैशाचे काहीसे ओझे हलके केले होते. त्यानंतर ४६४ कोटी रुपयांचे कंत्राट निश्चित करण्यात आले. आता पुन्हा कंपनीने दरवाढ मागितली आहे.
५० इलेक्ट्रिक बसचा डीपीआर घेणार
शहरात नेमका किती पाणीपुरवठा होतो हे जाणून घेण्यासाठी हायड्रोलिक मॉडेल करणे, २८ शाळांमध्ये स्मार्ट क्लासरूम उभारणे, शहरात ५० इलेक्ट्रिक बस आणि बुधवार पेठेतील जागेवर कार्यशाळा उभारणीचा प्रकल्प मागवून घेणे, स्मार्ट सिटी प्रकल्प बचतीमधून पाणीपुरवठ्यासाठी १० कोटींची तरतूद करणे, टाकळी ते जुळे सोलापूर पाणी टाकी दरम्यान नव्याने जलवाहिनीचा आराखडा करणे आदी कामांना मंजुरी देण्यात आली. जुना पुणे नाका येथे ७२ मीटर उंचीचा तिरंगा झेंडा उभारण्याच्या प्रस्तावावर पुढील बैठकीत चर्चा होणार आहे.
क्रिसील कंपनीला अधिकाऱ्यांचे अभय
स्मार्ट सिटीचे तांत्रिक सल्लागार असलेल्या क्रिसील कंपनीच्या कामावर पुन्हा संचालकांनी ताशेरे ओढले. या कंपनीला हटवण्याचा निर्णय मागील बैठकीत झाला होता, परंतु या कंपनीला काही अधिकारी अभय देत असल्याचे सोमवारच्या बैठकीत दिसून आले. स्मार्ट सिटीच्या संचालक मंडळाची बैठक पुन्हा १५ दिवसांनी होणार आहे.