संबंधित इंजेक्शन अद्यापपर्यंत माढा तालुक्यात कुठेच मिळत नसून ते सोलापूरलाच मिळत असल्याने व तेथेही शासकीय कागदपत्रांची पूर्तता करण्यातदेखील ग्रामीण भागातील रुग्णांंच्या नातेवाइकांना अनेक मनस्ताप सहन करावा लागत आहे. जिल्हाधिकाऱ्यांनी रेमडेसिविर इंजेक्शनबाबत डेडिकेटेड रुग्णालयांंनीच किंवा त्या डॉक्टरांनीच बाधित रुग्णांना इंजेक्शन जागेवरच उपलब्ध करून देण्याच्या दिलेल्या सूचना प्रत्यक्षात माढा तालुक्यात अद्यापपर्यंत अंमलात आल्या नसल्याचे दिसून आले. त्यामुळे रुग्णांच्या नातेवाइकांनी इंजेक्शनचे पैसे घ्या; पण आमच्या माणसांच्या जिवासाठी ते वेळेत उपलब्ध करून द्या, अशी भावनिक हाक येथील प्रशासनाकडे मारावी लागत आहे.
लोकमतच्या प्रस्तुत प्रतिनिधीने माढा तालुक्यातील अनेक बाधित रुग्णांच्या नातेवाइकांशी संवाद साधला. त्यांनी संबंधित इंजेक्शन मिळवण्यासाठी सोलापूरला जाऊन संपूर्ण दिवस घालवावा लागतोय तरीही ते मिळेल याची खात्री देता येत नाही, अशा परिस्थितीत ‘आमचे लक्ष ना रुग्णांकडे, ना घरी, ना दारी’ अशा भावना व्यक्त केल्या.
कुर्डूवाडी येथील डेडिकेटेड डॉ. बोबडे हॉस्पिटलमध्ये सध्या २५, डॉ. साखरे हॉस्पिटलमध्ये १७, आधार हॉस्पिटलमध्ये ५० व टेंभुर्णी येथील यशश्री हॉस्पिटलमध्ये १४ बाधित रुग्ण उपचार घेत आहेत. या रुग्णालयातील बाधित रुग्णाला डॉक्टरांच्या म्हणण्यानुसार रेमडेसिविर इंजेक्शन देणे आवश्यक आहे. तालुक्यातील या सर्व हॉस्पिटलला दररोज १७५ इंजेक्शनची आवश्यकता असल्याबाबत येथील आरोग्य व महसूलच्या अधिकाऱ्यांनी वरिष्ठांना रविवारी सायंकाळी कळविलेदेखील आहे. परंतु अद्याप अंमलबजावणी नाही. स्वतः जिल्हाधिकाऱ्यांनी याकडे लक्ष केंद्रित रुग्णांना दिलासा द्यावा, अशी मागणी होत आहे.
------
डेडिकेटेड हॉस्पिटलमधील बाधित रुग्णांना रेमडेसिविर इंजेक्शनची गरज असल्याचे जिल्हा आरोग्य अधिकाऱ्यांना कळविलेले आहे. अद्याप उपलब्ध झाली नाहीत. उपलब्ध झाल्यास त्वरित त्यांंना वितरित करण्यात येतील.
-
डॉ. शिवाजी थोरात, तालुका आरोग्य अधिकारी, माढा
----
माझ्या सत्तरवर्षीय आईला रेमडेसिविरची गरज होती म्हणून सोलापूरला गेलो होतो. परंतु तेथील कागदपत्रांची पूर्तता इतकी अवघड आहे की त्यातच दमछाक होते. सकाळी गेले की संध्याकाळी उशिरा एखादे इंजेक्शन मिळते. त्यामुळे इंजेक्शन मिळवण्यासाठी लागणारी सर्व कागदपत्रे ही सर्वत्र व्हाॅट्सॲपवर टाकावीत.
- मानसिंग हांडे, नातेवाईक, बाधित रुग्ण
----
जिल्हाधिकाऱ्यांच्या सूचनेनुसार जिल्हास्तरीय समिती कार्य करीत आहे. परंतु संबंधित इंजेक्शनचा राज्यात सर्वत्र प्रॉब्लेम निर्माण झालेला आहे. माढा तालुक्यात मंगळवारपासून सर्व डेडिकेटेड हॉस्पिटलमध्ये जागेवरच रेमडेसिविर इंजेक्शन मिळेल.
-भारत वाघमारे, उपजिल्हाधिकारी तथा अध्यक्ष रेमडेसिविर औषध पुरवठा देखरेख व नियंत्रण समिती, सोलापूर
----