इरफान शेख
कुर्डूवाडी : कोरोना व्हायरसच्या दहशतीमुळे कुर्डूवाडी शहरात दोन सख्ख्या चुलत भावांचा विवाह ठरलेल्या तिथीला न होता तातडीने साखरपुड्यात उरकण्यात आला. अवघ्या पाच तासात साखरपुड्यासह विवाह सोहळा संपन्न झाला़ यासाठी अवघा साडेसात हजार रुपये खर्च आला.
कुर्डूवाडी येथील संजय गाडेकर यांचा मुलगा योगेश याचा विवाह जयराम टाकसाळे (रा. आवर पिंपरी) यांची मुलगी ऋतुजा व गाडेकर यांचे सख्खे बंधू व गणेश गाडेकर यांचा मुलगा ईश्वर यांचा विवाह रामचंद्र दुधाळ (राहणार बार्शी) यांची मुलगी गौरी हिच्यासोबत १९ मे रोजी कुर्डूवाडी येथे ठरला होता़ त्यानुसार साखरपुड्यासाठी गौरी व ऋतुजा यांचे आई-वडील व ठराविक पाहुणे हे कुर्डूवाडी येथे दुपारी १ वाजता आले व अडीच वाजता दोघांचाही साखरपुडा झाला.
या साखरपुड्यासाठी आलेली मंडळी सुधीर गाडेकर, भारत काळे, ऋषिपाल वाल्मिकी, सुनील भोरे, संभाजी गोरे, नीलेश सुराणा, वसंत चौधरी, योगेश सुर्वेकर अशा मंडळींनी मध्यस्थी करून सध्या कोरोनाच्या साथीमुळे विवाहास गर्दी करता येणार नाही असे आलेल्या पाहुण्यांना समजावून सांगितले व त्वरित लग्न करण्याचे ठरले़ लागलीच दुपारी ४ वाजता दोन्ही विवाह सोहळे अगदी साध्या पद्धतीने उरकण्यात आले. केवळ आलेल्या पन्नास पाहुण्यांना जेवण दोन्ही लग्नांमध्ये देण्यात आले व उरलेल्या सर्व पाहुण्यांना जिलेबीचे वाटप करून हा विवाह सोहळा पार पडला.--------------कोरोनाने जगभरातील स्थिती बिघडवून टाकली आहे़ आपल्या विवाह सोहळ्यासाठी होणाºया गर्दीमुळे पाहुण्यांना त्रास नको या भावनेतून हे शुभमंगल उरकण्यात आले़ यात कसलीही खरेदी नाही, बस्ता नाही, वाजंत्री, घोडे नाहीत, पाहुणे रावळे यांचा मानपान नाही. विवाह सोहळ्यासाठी ठरवलेले मंगल कार्यालय, छापायला टाकलेल्या लग्नपत्रिका रद्द करण्यात आल्या़ नवरा नवरीनीही अगदी साधे घरगुती कपडे घातले होते. मात्र सर्वांचाच उत्साह हा जोरात होता असा अभूतपूर्व लग्न सोहळा केवळ आणि केवळ कोरोनामुळेच घडला असल्याची चर्चा सर्व शहरात होती.