करमाळा तालुक्यातील वांगी नं.१ येथील शेतकरी धनाजी भागवत देशमुख यांना मंगळवारी सायंकाळी साडेसहा वाजता शेतीची मशागत करीत असताना ट्रॅक्टरच्या उजेडात बिबट्या दिसून आला. गेल्याच आठवड्यात वन विभागाच्या कारवाईत एक बिबट्या मारला गेल्यानंतर पुन्हा दुसरा एक बिबट्या या परिसरात दिसल्याने वांगी, ढोकरी, बिटरगाव, भिवरवाडी परिसरातील ग्रामस्थ व शेतकऱ्यांमधून पुन्हा एकदा भीती निर्माण झाली आहे. बिबट्या दिसल्याने वन विभागाच्या सोलापूर व पुणे येथील अधिकाऱ्यांना कळविल्यानंतर बुधवारी दुपारी मोहोळ वन विभागाचे कर्मचारी वांगी नं. १ येथे आले. धनाजी देशमुख यांच्या शिवाराची पाहणी करून पावलांचे ठसे बिबट्याचेच आहेत. आम्ही आता आमच्या वरिष्ठांकडे फोटो पाठवतो, असे म्हणून निघून गेले.
म्हणे आता तुम्हाला बिबट्याबरोबरच राहवे लागेल..
बिबट्या हा मनुष्यावर सहसा हल्ला करत नाही. जुन्नर भागात शेकडो बिबटे शेतात वावरतात. शेतकरी त्यांना पाहतात. बिबट्या शेतकऱ्यांना कोणतीही इजा करत नाही. गेल्या आठवड्यात कारवाईमध्ये मारला गेलेला बिबट्या नरभक्षक होता. तेव्हा आता तुम्ही घाबरू नका, यापुढे तुम्हाला बिबट्याबरोबरच राहावे लागेल, असे बोल वन विभागाच्या अधिकाऱ्यांनी काढल्याचे बिटरगाव येथील महेंद्र पाटील यांनी सांगितले.
----
हा नरभक्षक नसेल कशावरून?
गेल्या आठवड्यात वन विभागाने केलेल्या कारवाईत मारला गेलेला बिबट्या नरभक्षकच होता का किंवा दुसराच बिबट्या कारवाईत मारला गेला का.. मग आता हा बिबट्या नरभक्षकच नसेल, असे अशावरून, असे अनेक प्रश्न शेतकऱ्यांतून विचारले जाऊ लागले आहेत. वन विभागाने वांगी व परिसरात नव्याने दिसलेल्या बिबट्यास जेरबंद करण्यासाठी पिंजरे लावावेत व गस्त वाढवावी, अशी मागणी पुढे येऊ लागली आहे.