सोलापूर : कुडल (ता. दक्षिण सोलापूर) ग्रामपंचायतीचे सरपंच अनिल जगदेव पाटील यांच्यावर सदस्यांनी दाखल केलेला अविश्वास ठराव मंजूर झाला असून, बुधवारी बोलावलेल्या विशेष ग्रामसभेत त्यांना शक्तिपरीक्षेला सामोरे जावे लागणार आहे. थेट जनतेतून सरपंचपदी निवड झालेले अनिल पाटील यांच्याविरोधात कुडल ग्रामपंचायतीच्या ७ पैकी ६ सदस्यांनी १५ फेब्रुवारीला अविश्वास प्रस्ताव दिला.
२२ फेब्रुवारीच्या सभेत सदस्यांनी ६ विरुद्ध १ मतांनी ठराव मंजूर केला. मात्र, अनिल पाटील यांची थेट जनतेतून सरपंचपदी निवड झाल्याने त्यांना ग्रामसभेत आपले बहुमत सिद्ध करावे लागणार आहे. तहसीलदार अमोल कुंभार यांनी सदस्यांच्या विशेष सभेतील अविश्वास ठरावाचा अहवाल जिल्हाधिकाऱ्यांना सादर केला.
जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशानुसार तहसीलदार अमोल कुंभार यांनी ७ जुलैला कुडल येथे विशेष ग्रामसभेचे आयोजन केले आहे. या सभेत सरपंच अनिल पाटील यांच्या विरोधात मंजूर झालेला ठराव मांडला जाणार असून, त्यावर मतदान घेण्यात येणार आहे. तहसीलदारांनी ग्रामसभेची नोटीस बजावली आहे.
-------
ग्रामसभेत होणार मतदान
थेट जनतेतून निवड झाल्याने अनिल पाटील यांना ग्रामसभेत बहुमत सिद्ध करावे लागणार आहे. सकाळी सात वाजल्यापासून १२ वाजेपर्यंत ग्रामस्थांची नोंदणी करण्यात येईल. त्यानंतर दुपारी १२.३० पासून तीन वाजेपर्यंत मतदान प्रक्रिया घेण्यात येणार आहे. नोंदणी केलेल्या ग्रामस्थांनाच मतदानात भाग घेता येईल. मतदानानंतर लगेच मतमोजणी आणि निकाल जाहीर करण्यात येणार असल्याची माहिती तहसीलदार अमोल कुंभार यांनी दिली.
-------
दुसरी ग्रामपंचायत
यापूर्वी दक्षिण सोलापूर तालुक्यातील धोत्री ग्रामपंचायतीच्या सरपंचावर अविश्वास ठराव मंजूर झाला. नव्या ग्रामपंचायत अधिनियमातील तरतुदीनुसार ग्रामसभेत हा ठराव मांडावा लागतो. साध्या बहुमताने तो मंजूर अथवा नामंजूर झाल्यानंतरच
त्यावर अंतिम निर्णय घेतला जातो. धोत्रीनंतर कुडल ही तालुक्यातील दुसरी ग्रामपंचायत आहे.