सोलापूर : कोरोनाचा प्रादुर्भाव वाढू नये म्हणून जिल्ह्यात ग्रामीण भागात मंडळांना गणेश प्रतिष्ठापनेला परवानगी नाकारण्यात आली आहे. काही गावांत ‘एक गाव, एक गणपती’अंतर्गत काही मंडळांनी समाजमंदिरात गणरायाची प्रतिष्ठापना केली आहे, तर काही कार्यकर्त्यांनी घरातच मूर्तीची प्रतिष्ठापना केली आहे. यंदाही रस्त्यावर ‘ना ढोल ना ताशा दिसला, ना लेझीम...केवळ गणपती बाप्पा मोरया’चा आवाज झाला.
अक्कलकोटमध्ये नगरमधील मूर्ती
अक्कलकोट : कोरोनामुळे यंदा उत्तर पोलीस ठाणे आणि दक्षिण पोलीस ठाणे या दोन्ही कार्यालयांनी एकाही मंडळाला परवानगी दिलेली नाही. उत्तर पाेलीस ठाणेअंतर्गत १०८, तर दक्षिण पोलीस ठाणेअंतर्गत १४२ मंडळे आहेत. या मंडळांनी कसलाही गाजावाजा न करता मूर्ती प्रतिष्ठापना केली, तसेच यंदाही अक्कलकोटमध्ये तयार झालेल्या गणपती मूर्तींना परराज्यातून मागणी झाली आणि अक्कलकोटमधील भक्तांच्या घरोघरी अहमदनगरच्या मूर्ती बसविल्या गेल्या.
---
करमाळ्यात समाजमंदिरात प्रतिष्ठापना
करमाळा : यंदा कोरोनाचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी करमाळा शहरात ३६ आणि तालुक्यात जवळपास ९६ सार्वजनिक मंडळांनी केवळ समाजमंदिरात सार्वजनिक गणरायाची प्रतिष्ठापना केली. कार्यकर्त्यांनी मोह टाळत ढोल-ताशाला फाटा दिला.
---
उत्तर सोलापूरमध्ये दोन फुटांच्या मूर्ती
उत्तर सोलापूर : तालुक्यात यंदा सार्वजिनक मंडळांनी मंडप न टाकता समाजमंदिरात प्रतिष्ठापना करून आरती केली. उत्तर सोलापूर तालुक्यात जवळपास ७८ मंडळांनी शांततेत प्रतिष्ठापना केली. नान्नज, वडाळा, बीबी दारफळ, रानमसले आदी ठिकाणी शांततेत गणरायाची प्रतिष्ठापना झाली. यंदा एक आणि दोन फूट उंचीच्या मूर्तीला उत्तर सोलापूरकरांनी सर्वाधिक पसंती दिली.
---
मंगळवेढ्यात ‘एक गाव, एक गणपती’
मंगळवेढा : मंगळवेढा तालुक्यात ‘एक गाव, एक गणपती’ला प्रतिसाद मिळाला. मंडळांनी यंदा ढोल-ताशाचा मोह टाळला. मात्र, घरगुती गणेश प्रतिष्ठानेबाबत सर्वसामान्यांचा उत्साह जाणवला. छोट्या-छाेट्या मूर्तींना सर्वसामान्यांनी प्रतिसाद दिला.
----
दक्षिण सोलापुरात ६० मंडळांकडून मंडपाविना प्रतिष्ठापना
दक्षिण सोलापूर : तालुक्सात जवळपास ६० मंडळे असून, या मंडळांनी यंदा मंडप न टाकता साध्या पद्धतीने समाजमंदिरात अथवा कार्यकर्त्यांनी घरीच प्रतिष्ठापना केली. भंडारकवठे, मंद्रूप परिसरात शांततेत गणरायाची प्रतिष्ठापना करण्यात आली.