सोलापूर: सोलापूर ते पुणे या महामार्गाचे बहुतांश काम झाले; मात्र जिल्हा प्रशासनाचे दुर्लक्ष, भूसंपादनाचे अडथळे, रेल्वेची अडेलतट्टू भूमिका यामुळे सुपरफास्ट प्रवासाला काही ठिकाणी ‘ब्रेक’ लागला आहे़ मोडनिंब येथे उड्डाणपूल (रेल्वे ओव्हर ब्रीज- आरओबी) बांधून तयार झाला; मात्र या नव्या पुलावरुन सुरू झालेली वाहतूक बंद करण्यात आली आहे़ रेल्वे आणि महामार्गाच्या वादामुळे येथे रेल्वे क्रॉसिंगच्या वेळी दररोज वाहतुकीची भली मोठी कोंडी होते़ मोडनिंब येथे रेल्वे क्रॉसिंग असल्यामुळे येथे सहापदरी उड्डाणपूल बांधण्यात आला आहे़ यासाठी तब्बल १० कोटींहून अधिक निधी खर्च झाला़ पुलावरुन वाहतूक सुरू झाल्यानंतर रेल्वेकडून महामार्गावरील गेट बंद केले जाणार आहे़ त्यामुळे जुना रस्ता पूर्ववत सुरू ठेवावा नाहीतर दुसरा एक पूल मोडनिंबसाठी बांधावा अशी मागणी पुढे येत आहे़मोडनिंबमध्ये ये-जा करण्यासाठी नव्या पुलाचा उपयोग नाही़ त्यामुळे मोडनिंबकडे जाणारा आणखी एक पूल करावा अशी मागणी गावकर्यांची आहे; मात्र त्याला राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने मंजुरी दिल्याशिवाय हे काम होणार नाही़ भव्यदिव्य चकाचक चारपदरी रस्ता, दुभाजक, सर्व्हिस रोड, मध्यभागी रंगीबेरंगी फुलझाडी यामुळे साहजिकच या मार्गावरील वाहतूक सुपरफास्ट आणि आरामदायी होऊ लागली आहे़ सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समिती ते भीमानगर (भीमा नदी पूल हिंगणगाव) या १०२ किलोमीटर लांबीच्या रस्त्याच्या चौपदरीकरणाचे काम आयएल अॅण्ड एफएस या कंपनीने केले़ सध्या ८९ टक्के काम सध्या पूर्ण झाले आहे़ झालेल्या कामाच्या प्रमाणात सावळेश्वर आणि वरवडे या दोन ठिकाणी टोल सुरू झाला आहे़ भीमा आणि सीना नदीवरील पूल, मोहोळ येथे उड्डाणपूल, सावळेश्वर , बाळे आणि जुना पुणे नाका या ठिकाणी सात मोठ्या पुलांचा या कामात समावेश असून, मोडनिंब आणि सावळेश्वर येथे रेल्वे ओव्हर ब्रीजचे काम झाले आहे तेथून वाहतूकही सुरू झाली मात्र मोडनिंबचा प्रश्न अद्याप सुटला नाही़
----------------------------------------------
महामार्ग पोलिसांचा ‘अडथळा’ महामार्गावर मदतीसाठी महामार्ग पोलीस कार्यरत असतात; मात्र मोडनिंबमध्ये असलेले महामार्ग पोलीस कार्यालय उड्डाणपुलामध्येच अडकले आहे़ वरिष्ठापासून कनिष्ठापर्यंत सर्वत्र पत्रव्यवहार झाला तरीही हे कार्यालय निघाले नाही़ यामुळे १० कोटींच्या उड्डाणपुलाचे काम अर्धवट झाले आहे़ जिल्हाधिकारी तरी या महत्त्वाच्या प्रश्नाकडे लक्ष देतील काय अशी विचारणा होत आहे़
------------------------------------