सोलापूर : अलीकडे सोशल मीडियावरून जागोजागी मुलांचे अपहरण करून शरीरातील किडनी व अन्य अवयव काढून घेणारी टोळी कार्यरत असल्याची बातमी पसरवून नागरिकांमध्ये भितीचे वातावरण पसरवले जात आहे़ पण सोलापूर जिल्ह्याती कोणत्याही भागात अथवा गावात मुलांच्या अपहरणाची घटना घडली नसून नागरिकांनी अशा भीती पसरवणाºया अफवांवर विश्र्वास ठेवू नये असे आवाहन उपविभागीय पोलीस अधिकारी अभय डोंगरे यांनी आॅनलाइन लोकमतशी बोलताना केले आहे़
पुढे बोलताना अभय डोंगरे म्हणाले की, सध्या शाळांना सुट्या लागल्या आहेत़ लहान लहान मुले दिवसभर विविध खेळ खेळत आहेत़ अशातच कुठल्यातरी घटनांचे फोटो व व्हिडिओ अपलोड करून त्याद्वारे मुलांचे अपहरण केले जात आहे तेव्हा नागरिकांनी सावध रहावे असे आवाहन करणारे मॅसेज व व्हिडिओ सोशल मिडियावर व्हायरल होत आहेत़ एवढेच नव्हे तर वेगवेगळ्या कारणासाठी परगावहून आलेल्या अपरिचित निष्पाप व्यक्तींना पकडून गावातील नागरिक मारहाण करण्याचे प्रकारही घडत आहेत़ तेव्हा नागरिकांनी कोणत्याही निष्पाप व्यक्तींना मारहाण करून कायदा हातात घेऊ नये, अशा प्रकरणी कोणी सापडल्यास त्यांच्याविरुद्ध कडक कारवाई करण्यात येईल.
सोलापूर जिल्हा पोलिस अधीक्षक एस़ विरेश प्रभू यांच्या मार्गदर्शनानुसार जिल्ह्यात सर्वत्र याविषयी जनजागृती करण्यात येत असल्याचेही पोलीस उपअधीक्षक अभय डोंगरे यांनी यावेळी सांगितले़ जिल्ह्यात कोणत्याही गावात अनोळखी व संशयास्पद व्यक्ती दिसून आल्यास जवळच्या पोलीस ठाण्याशी संपर्क साधावा अन्यथा १०० नंबरवर फोन करून तशी माहिती कळवावी़ कोणत्याही निष्पाप व्यक्तींना नागरिकांनी मारहाण करू नये़ शिवाय मोबाईलवर अफवा पसरविणाºया व्यक्तींविरूध्द पोलीस कडक कारवाई करणार आहे़ त्यामुळे कोणत्याही व्यक्तींनी सोशल मिडियावर त्याप्रकारचे व्हिडिओ व फोटो व्हायरल करू नये असेही डोंगरे यांनी नमुद केले आहे़