सोलापूर : पंढरपूर- मंगळवेढा विधानसभा मतदार संघाच्या पोटनिवडणुकीची मतमोजणी आता अवघ्या काही तासांवर येऊन ठेपली आहे. उद्या (रविवारी) सकाळी आठ वाजता सर्वप्रथम पोस्टल मतांची मोजणी होणार आहे. मतमोजणीच्या पार्श्वभूमीवर त्या ठिकाणी पोलिसांचा तगडा बंदोबस्त असणार आहे. तर मतमोजणी पूर्ण होण्यास सायंकाळी साडेसात ते आठ वाजतील, असे प्रशासनाच्या वतीने सांगण्यात आले.
मतमोजणीच्या पार्श्वभूमीवर सोलापूर ग्रामस्थांनी पोलीस सर्विस मोठा पोलीस बंदोबस्त तैनात केला आहे. विविध ठिकाणी नाकाबंदी, सर्व मतमोजणी केंद्र परिसरात त्रिस्तरीय नाकाबंदी केली आहे. पास असणाऱ्या प्रतिनिधींना मतमोजणी केंद्रात प्रवेश दिला जाणार असल्याची माहिती पोलिस अधीक्षक तेजस्वी सातपुते यांनी दिली.
निकाल ऐकण्यासाठी पंढरपूर व मंगळवेढा तालुक्यातील कोणत्याही नागरिकांनी घराबाहेर पडू नये, विनाकारण फिरताना आढळल्यास वाहन जप्त करून संबंधितांवर गुन्हे दाखल करण्याचे आदेश पोलिस अधीक्षकांनी दिले आहेत. विजय मिरवणूक व जल्लोष करण्यासाठी निर्बंध घातले आहे.