साेलापूर : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या सरकारने विश्वासदर्शक ठराव जिंकला. सरकार स्थापनेत भाजपच्या राष्ट्रीय नेतृत्वाने मारलेल्या मास्टर स्ट्राेमुळे मंत्रिपदाबद्दल भाजपतील आमदारांमध्ये धाकधूक आहे. मंत्रिपदाचे काय व्हायचं ते हाेऊ द्या, असे म्हणत हे आमदार आपल्या मतदारसंघात सक्रिय झाले आहेत.
भाजपतून आमदार सुभाष देशमुख मंत्रिपदाचे मुख्य दावेदार आहेत. गडकरी गटाकडून त्यांचे नाव निश्चित हाेईल, असे सांगितले जाते. देशमुख मंगळवारीच सोलापुरात दाखल झाले. बुधवारी सकाळी कार्यालयात त्यांनी नागरिकांशी संवाद साधला. दुपारी एका लग्नाला हजेरी लावून लोकमंगल बँकेत बसून पुन्हा नागरिक, कार्यकर्त्यांशी संवाद साधला.
मंत्रिपदाचे मुख्य दावेदारांपैकी आणखी एक आमदार विजयकुमार देशमुख हे सुद्धा मंगळवारी सोलापुरात आले. बुधवारी सकाळी कार्यालयात कार्यकर्त्यांच्या गाठीभेटी घेतल्या. हिरेहब्बू वाड्यातीलश्री सिद्धेश्वर महाराज यांच्या चरित्र ग्रंथाची नुकतीच चाेरी झाली आहे. पाेलिसांनी तपास सुरू केला आहे. पाेलिसांनी एका विहिरीजवळ पाहणी केली. या पाहणीवेळी आमदार देशमुखांनी हजेरी लावली. आमदार देशमुख यांना मंत्रिपद मिळेल आणि राजवाडे चाैकात पुन्हा जल्लोष हाेईल, असे कार्यकर्त्यांना वाटते.
अक्कलकाेटचे आमदार सचिन कल्याणशेट्टी आणि माळशिरसचे आमदार राम सातपुते यांना ‘टीम देवेंद्र’मधील आघाडीचे ‘फलंदाज’ समजले जाते. धक्का तंत्राचा प्रयाेग म्हणून या दाेघांना मंत्रिमंडळात संधी मिळेल अशी चर्चा आहे. जे काय हाेईल ते देवेंद्र यांनाच माहीत, असे सांगत दाेघेही मतदारसंघात पाेहाेचले. आमदार कल्याणशेट्टी यांनी बुधवारी जनता दरबार घेतला. आमदार सातपुते यांनी माळशिरसमधील कार्यकर्त्यांच्या गाठीभेटी घेतल्या.
---
राऊत यांनी घेतल्या आढावा बैठका
शिंदे सरकारला अपक्ष आमदारांचा पाठिंबा आहे. यात बार्शीचे अपक्ष आमदार राजेंद्र राऊत हे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे म्हणून ओळखले जातात. यातूनच राऊत यांना मंत्रिमंडळात संधी मिळेल, असे त्यांचे कार्यकर्ते सांगतात. राऊत यांनी मंगळवारी बार्शी गाठली. बुधवारी कृषी उत्पन्न बाजार समितीच्या कार्यालयात बसून कृषी विभाग, नगरपालिकेच्या आढावा बैठका घेतल्या.
--
आवताडे दामाजीच्या रिंगणात
मंगळवेढ्यातील दामाजी सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीची रणधुमाळी साेडून आमदार समाधान आवताडे यांना सरकार स्थापनेच्या गाेंधळात सहभागी व्हावे लागले हाेते. मंत्रिपदाच्या चर्चेत त्यांचेही नाव आहे. मात्र, यावर भाष्य न करता आमदार आवताडे बुधवारी कारखान्याच्या निवडणूक प्रचारात सक्रिय झाले. बुधवारी त्यांनी बठाण, सिद्धापूर, आरळी, नंदूर येथील प्रचार सभांना हजेरी लावली.
-
रणजितसिंह मुंबईकडे रवाना
महाविकास आघाडीस सरकार संकटात आल्यापासून आमदार रणजीतसिंह माेहिते-पाटील यांच्या मंत्रिपदाची चर्चा आहे. माेहिते-पाटील यांनीही यावर भाष्य केलेले नाही. रणजितसिंह मंगळवारी अकलूजमध्ये हाेते. पालखी साेहळ्यातील कार्यक्रमांना हजेरी लावल्यानंतर बुधवारी त्यांनी कार्यकर्त्यांच्या भेटी घेतल्या. यानंतर वैयक्तिक कामासाठी ते मुंबईला रवाना झाले.