करमाळा: करमाळा कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये जयवंतराव जगताप यांच्याऐवजी चंद्रकांत सरडे हे सभापती होत असल्याचे समजल्यानंतर ही संधी का सोडावी म्हणून बागल गटात प्रवेश केला आणि सभापती झालो. माझा बोलाविता धनी मोहिते-पाटील अथवा नारायण पाटील नसल्याचे बाजार समितीचे नूतन सभापती शिवाजी बंडगर यांनी सांगितले.
करमाळा बाजार समिती निवडणुकीत नाट्यमय घडामोडीतून बंडगर हे सभापती झाले. त्यानंतर उलटसुलट चर्चा होऊ लागली. या पार्श्वभूमीवर बंडगर ‘लोकमत’शी बोलताना म्हणाले, मी आ. नारायण पाटील व जयवंतराव जगताप युतीतून विजयी झालो. माजी आ. जयवंतराव जगताप हेच सभापतीपदाचे उमेदवार ठरले होते; मात्र निवडणुकीत त्रिशंकू स्थिती झाली. जयवंतराव जगताप यांना सभापतीसाठी दोन सदस्य हवे होते. झेडपी अध्यक्ष संजय शिंदे यांच्या गटाकडे चंद्रकांत सरडे व सावंत गटाचे वालचंद रोडगे हे दोन सदस्य होते. या दोघांना सोबत घेण्यासाठी आठ दिवसात बºयाच बैठका झाल्या.
या बैठकीत सावंत गटाचे सुनील सावंत यांनी चंद्रकांत सरडे यांच्या नावाचा आग्रह धरला. अखेरच्या क्षणी जगताप हतबल झाले आणि सरडे यांच्या नावाला संमती दिली. निवडीच्या अगोदरच्या दिवशी मंगळवारी आ. नारायण पाटील यांच्याकडे गेलो. ते मुंबईला निघाले असताना जयवंतराव जगताप सभापती व चंद्रकांत सरडे उपसभापती असा अंतिम निर्णय झाल्याचे त्यांनी सांगितले. त्यावर हे सगळे खोटे असून चंद्रकांत सरडे हेच सभापती होणार असल्याचे ठरले आहे, असे आपण आ. पाटील यांना सांगितले.
यासाठी घेतला निर्णय- बागल गट मला सभापतीपद द्यायला तयार आहे, मात्र त्यासाठी गटात प्रवेश करण्याची अट घातली आहे, अशी माहिती आ. पाटील यांना आपण दिली. त्यावर पाटील यांनी असे करू नका, बागल गटात जाऊ नका, तसा निर्णय घेऊ नका असे सांगितले होते. चंद्रकांत सरडे वाटाघाटी करून सभापती होत असतील तर मी गेली २५ वर्षे राजकारणात आहे. प्रपंचाची राखरांगोळी केली, ही संधी का घालवायची असा विचार केला. जगताप यांच्याऐवजी सरडे सभापती होणार असल्याने आपण बागल गटात जाण्याचा निर्णय घेतला, असे बंडगर यांनी सांगितले.