सोलापूर: प्रवेशद्वार रिकामेच असल्याने बाजार समिती प्रशासनाने कोरोनाबाबत गंभीर नसल्याचे दिसत आहे. मनपाचे कर्मचारी शेतकऱ्यांकडे दंडाच्या पावत्या मात्र देत असल्याचे सोमवारी दिसून आले.
कोरोनाबाबत दक्षता घेण्यासाठी रविवारी जिल्हा उपनिबंधक कुंदन भोळे यांनी बाजार समितीत प्रशासन, मनपा अधिकारी व पोलिसांसमवेत बैठक घेतली. बाजार समिती प्रशासनाने गेटवर तपासणी करुनच शेतकरी, व्यापारी व कर्मचाऱ्यांना आत सोडण्याबाबत सूचना दिल्या होत्या. मात्र सूचना दिलेल्या पहिल्याच दिवशी सोमवारी सोलापूर बाजार समिती प्रशासनाने काहीच उपाययोजना केली नव्हती. हात धुण्यासाठीही जुजबीच सोय केली असल्याचे दिसत होते. शेतकऱ्यांसोबत बाजार समितीचे व आडत्यांचे कर्मचारीही विनामास्कचे वावरत होते.
मनपाचे कर्मचारी दंड करण्यासाठी पावत्या घेऊन फिरत होते. बाजार समिती प्रशासनाने मात्र कोरोना बाबत दक्षता घेण्याची तसदी घेतली नसल्याचे दिसून आले. याबाबत सचिव अंबादास बिराजदार यांना विचारले असता माहिती घेऊन सांगतो असे सांगितले.
पदाधिकारी ऑफिसपर्यंतच..
सभापती, उपसभापती व संचालक हे महिन्यातून एक वेळा बैठकीला ऑफिसला येतात व माघारी जातात. इतर वेळी गाऱ्हाणी ऐकण्यासाठीही कोणी उपस्थित नसते. त्यामुळे कोरोनाच्या काळात मनपा, पोलीस व सहकार खात्याच्या अधिकाऱ्यांना बैठक घ्यावी लागली. मात्र बाजार समिती प्रशासन गंभीर झाले नाही.