सोलापूर : कोरोनाशी दोन हात करण्यासाठी फौजदार चावडी पोलिसांनी यंदा गणेशोत्सवात ‘रस्त्यावर ना मंडप ना प्रतिष्ठापना’ ही भूमिका घेतली असून, रविवारी सकाळी बोलावण्यात आलेल्या बैठकीत मध्यवर्ती सार्वजनिक गणेशोत्सव ट्रस्ट अन् उत्सव समितीच्या माजी पदाधिकाºयांनी या भूमिकेचे जोरदार स्वागत केले. आपण दिलेल्या आदेशाचे तंतोतंत पालन होईल, असे आश्वासनही ट्रस्टी अध्यक्ष नरसिंग मेंगजी यांच्यासह पदाधिकाºयांनी दिले.
येत्या २२ आॅगस्टपासून सार्वजनिक गणेशोत्सवाचा श्रीगणेशा होणार आहे. या गणेशोत्सवावरही कोरोनाचे सावट आहे. वर्षातील या एकमेव उत्सवात लाखो, हजारो भाविक एकवटताना दिसतात. त्यामुळे कोरोनाचा अधिक संसर्ग होण्याची भीतीही आहे. हा धागा पकडून फौजदार चावडी पोलिसांनी रविवारी सकाळी ठाण्यात बोलावलेल्या बैठकीत फौजदार चावडी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक संजय साळुंखे यांनी आपली भूमिका स्पष्ट करताना मध्यवर्ती सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाचे ट्रस्टी आणि पदाधिकाºयांना काही अटी, नियम घालून दिले. सर्वच अटी, नियम मान्य असल्याचेही पदाधिकाºयांनी स्पष्ट करीत पूर्ण सहकार्य करण्याचे आश्वासनही दिले.
बैठकीस मध्यवर्ती सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाचे ट्रस्टी तथा माजी आमदार नरसिंग मेंगजी, उत्सव समितीचे माजी अध्यक्ष प्रताप चव्हाण, केदार मेंगाणे, अनिल गवळी, विजय पुकाळे, अंबादास गुत्तीकोंडा यांच्यासह मंडळाचे पदाधिकारी, सदस्य आणि फौजदार चावडी पोलीस ठाण्याचे दुय्यम पोलीस निरीक्षक कदम उपस्थित होते. काही पदाधिकाºयांनी आपल्या सूचनाही मांडल्या. त्या सूचनांचा जरुर विचार करु, असे संजय साळुंखे यांनी सांगितले.
दरम्यान, सध्या कोरोनाचे संकट वाढल्यामुळे हा उत्सव अत्यंत साधेपणाने करण्याची बहुसंख्य सोलापूरकरांची भूमिका आहे. शिवाय गणेशमूर्ती खरेदी करण्यासाठीही गर्दीत न जाण्याबाबत प्रबोधन करण्यात येत आहे. ‘लोकमत’ ने यासाठी ‘शाडूचे गणपती घरोघरी’ ही मोहीम हाती घेतली असून, शहरवासीयांकडून या मोहिमेला प्रतिसाद मिळत आहे.
मध्यवर्तीच्या बैठकीतही ‘लोकमत’च्या उपक्रमाचे स्वागत
- - घराघरात पर्यावरणपूरक अर्थात शाडूच्या गणेश मूर्ती प्रतिष्ठापनेची ‘लोकमत’ने संकल्पना मांडली आहे. या संकल्पनेचे मध्यवर्ती सार्वजनिक मंडळाच्या बैठकीत स्वागत करण्यात आले. विविध मंडळांना पर्यावरणपूरक गणेश मूर्ती प्रतिष्ठापना करण्याबाबत आवाहन करणार असल्याचे ट्रस्टी तथा माजी आमदार नरसिंग मेंगजी यांच्यासह पदाधिकाºयांनी केले.
- - मीठ गल्ली येथील शिवानुभव मंगल कार्यालयात आयोजित बैठकीस उपाध्यक्ष श्रीशैल बनशेट्टी, कार्यवाह संजय शिंदे, बसवराज येरटे, कैलास मेंगाणे, विवेकानंद उपाध्ये, अंबादास गुत्तीकोंडा, घनश्याम भैय्या, मल्लिनाथ याळगी, लता फुटाणे, बाबा शेख, दिलीप पाटील आदी उपस्थित होते.
रविवारी नवीन कार्यकारिणी जाहीर होणार- गणेश उत्सव कसा साजरा करायचा, त्याकरिता शासकीय नियमावली काय आहे, पोलीस आयुक्तालयाची भूमिका काय असणार आहे, यासंदर्भात काही पदाधिकाºयांनी प्रश्न केला. गणेश उत्सवाच्या नियमावली संदर्भात पोलीस आयुक्तांशी चर्चा करणार आहोत. त्यानुसार पुढील भूमिका ठरविण्यात येणार असल्याचे ट्रस्टी अध्यक्ष नरसिंग मेंगजी, संजय शिंदे यांनी सांगितले. रविवार दि. १६ आॅगस्ट रोजी सायंकाळी मध्यवर्ती मंडळाची पुढील बैठक होणार आहे. या बैठकीत नवीन कार्यकारिणी जाहीर होणार आहे.
पासची कटकटही नाही...कोरोनाचा प्रादुर्भाव होऊ नये म्हणून यंदाचा गणेशोत्सव अगदी साधेपणाने करण्यावर सार्वजनिक गणेशोत्सव मंडळं अन् गणेश भक्तांमध्ये एकमत होत असतानाचे चित्र दिसत आहे. त्यातच कोरोनामुळे फौजदार चावडी पोलिसांनी दिलेल्या आदेशामुळे यंदाचा गणेशोत्सव सार्वजनिक ठिकाणी करता येणार नसल्याचे जणू आदेशच दिले आहेत. त्यामुळे मंडप, ध्वनिक्षेपक, मिरवणूक आदी कामांसाठी पोलिसांकडून परवाने घ्यावे लागत होते. नव्या आदेशानुसार आता परवाने घेण्याची कटकट मंडळांच्या पदाधिकाºयांना राहणार नाही.
सोलापूरवर कोरोनाचे संकट आहे. आता कुठे त्याची तीव्रता कमी होत असल्याचा आनंदही आहे. कोरोनाला हद्दपार करण्यासाठी यंदा गणेशोत्सवाला मुरड घालावी लागणार आहे. फौजदार चावडी पोलिसांनी घेतलेल्या भूमिकेचे मी स्वागत करतो. आमच्याही काही सूचना त्यांच्यासमोर मांडल्या.-श्रीशैल बनशेट्टी,ट्रस्टी उपाध्यक्ष- मध्यवर्ती सार्वजनिक गणेशोत्सव.
सध्या शहरात कोरोनाचा संसर्ग कमी होत चालला आहे. तो कायमचा नायनाट व्हावा, ही माझी तळमळ आहे. गणेशोत्सवात पुन्हा त्याचा संसर्ग मोठ्या प्रमाणात वाढू नये यासाठी रस्त्यावर मंडप घालता येणार नाही ना प्रतिष्ठापना. या भूमिकेचे मंडळाचे ट्रस्टी आणि पदाधिकाºयांनी स्वागत केले आहे. -संजय साळुंखे,वरिष्ठ पोलीस निरीक्षक- फौजदार चावडी ठाणे.