सोलापूर : कोरोनाचे भय काही संपेना... हे भय अन् भीती दूर करण्याबरोबर कोरोनाशी दोन हात करण्यासाठी यंदाचा नवरात्र महोत्सव रस्त्यावरील मंडप, मिरवणुकीविना साजरा होणार आहे. जसा गणेशोत्सव तसाच यंदाचा नवरात्रोत्सव अगदी साधेपणाने साजरा होणार आहे. मंगळवारी सार्वजनिक मध्यवर्ती नवरात्र महोत्सव महामंडळाच्या बैठकीत या निर्णयावर शिक्कामोर्तब होणार असल्याचे सांगण्यात आले.
कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी जिल्हाधिकाºयांनी सार्वजनिक उत्सव, विवाह आणि अन्य कार्यक्रमांवर बंदी घातली आहे. २२ मार्चपासून देश लॉकडाऊनमध्ये गेला.
मंदिरं, मस्जिद, गुरुद्वारा बंद आहेत. दरम्यान, आंबेडकर जयंती, रमजान ईद आणि त्यानंतरचा गणेशोत्सवही साधेपणाने साजरा झाला. कोरोनाची एकूण परिस्थिती पाहता यंदा देवीभक्तांना घरच्या घरीच आणि मंडळांच्या कार्यकर्त्यांना जागेवरच शक्तीदेवींचा जागर करावा लागणार आहे. नवरात्रोत्सव हा महिलांचा विशेष उत्सव असल्याने मोठ्या प्रमाणावर त्या दर्शनासाठी घराबाहेर पडत असतात. उत्सवातील ही गर्दी टाळण्यासाठी सार्वजनिक नवरात्र महोत्सव महामंडळाच्या पदाधिकाºयांनी आणि कार्यकर्त्यांनी जसा गणेशोत्सव तसाच यंदाचा नवरात्र महोत्सव साजरा करण्याचा विचार केला आहे.
जिल्हाधिकाºयांनी घालून दिलेल्या नियमांचे आणि अटींचे काटेकोरपणे पालन करण्याची हमीही मंगळवारच्या बैठकीत देण्यात येणार आहे. जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर हे ज्या काही अटी आणि नियम घालून देतील, त्यानुसार यंदाचा नवरात्र महोत्सव साजरा करण्याचा निर्धार महामंडळाचे सुनील रसाळे, दिलीप कोल्हे, दत्तात्रय मेनकुदळे, बसवराज येरटे, धोत्रे, मल्लिनाथ याळगी आदी पदाधिकारी आणि सदस्य मंगळवारच्या बैठकीत करणार आहेत.
शहरात २५० मंडळांकडून प्रतिष्ठापनासार्वजनिक मध्यवर्ती नवरात्र महोत्सव महामंडळाच्या माध्यमातून शहर आणि हद्दवाढ परिसरात दोनशे ते अडीचशे मंडळांकडून शक्तीदेवींची प्रतिष्ठापना करण्यात येते. सर्वच मंडळांकडून प्रतिष्ठापनेनिमित्त मिरवणुका काढल्या जातात. दसरा म्हणजे सीमोल्लंघनासाठी ३३ मंडळांची एकत्रित मिरवणूक काढली जाते. यंदा ज्या-त्या मंडळांची प्रतिष्ठापना जागेवरच करण्याचा निर्णय बैठकीत घेण्यात येणार आहे.
यंदाचा नवरात्रोत्सव अगदी साधेपणाने साजरा करण्याचा निर्णय मंगळवारच्या बैठकीत घेण्यात येईल. उत्सवानिमित्त गर्दी होऊ नये यासाठी महामंडळाचे पदाधिकारी, सदस्य योग्य ती काळजी घेतील. यंदा कोरोनामुळे विधायक कार्यावर भर दिला जाणार आहे. कोरोनाविषयी जनजागृती करण्याबाबत बैठकीत साºयांचे मत जाणून घेणार आहोत. गणेशोत्सवानुसार नवरात्रोत्सवातही मंडप आणि मिरवणुकींना फाटा देण्याचा निर्णयही बैठकीत होईल.-सुनील रसाळे,माजी अध्यक्ष- सार्वजनिक नवरात्र महोत्सव महामंडळ
कोरोनाला हद्दपार करण्यासाठी गर्दी टाळणे हा एकमेव पर्याय आहे. नवरात्र महोत्सवातील गर्दी टाळण्यासाठी जिल्हाधिकाºयांच्या आदेशाचे पालन नक्कीच करु. जसा गणेशोत्सव तसाच यंदाचा नवरात्रोत्सव साजरा करण्याबाबत बैठकीत विचारविनिमय करण्यात येईल. जागेवरच शक्तीदेवींची प्रतिष्ठापना करा आणि घरच्या घरीच शक्तीदेवींचा जागर करण्याबाबत मंगळवारच्या बैठकीत आवाहन करण्यात येईल. देवीभक्तांकडून सहकार्याची अपेक्षा आहे. -वीरभद्रेश बसवंती,विद्यमान अध्यक्ष-सार्वजनिक नवरात्र महोत्सव महामंडळ