सोलापूर जिल्ह्यातील महसूल विभागातील तलाठी हे मंडल अधिकारी पदासाठी पात्र आहेत. मात्र त्यांना मागील तीन वर्षांपासून पदोन्नती मिळत नसल्याने पात्र तलाठ्यांचे आर्थिक नुकसान होत आहे. मंडळ अधिकारी, नायब तहसीलदार, तहसीलदार पदाच्या बढतीस पात्र असूनही या पदावर काम करता आले नाही, याची खंत काही सेवानिवृत्त तलाठ्यांच्या मनात आहे. वेळीच पदोत्रती न मिळाल्याने सेवानिवृत्त तलाठ्यांचा पेन्शनदर कमी झाला.
तलाठी संघाच्या पदाधिकाऱ्यांनी या विषयाबाबत वारंवार पाठपुरावा करूनदेखील प्रशासनाने गांभीर्यपूर्वक विचार केला नाही. तलाठी व मंडल अधिकाऱ्यांच्या अडचणी सोडविण्याबाबत प्रशासनाची उदासीनता दिसून येत आहे. यामुळे बुधवारपासून कामबंद आंदोलन केले आहे. आंदोलनाच्या काळात होणाऱ्या परिणामास प्रशासन जबाबदार राहील, असे निवेदन तहसीलदार सुशीलकुमार बेल्हेकर यांना तलाठी संघाच्या पदाधिकाऱ्यांनी मंगळवारी दिले. त्यानुसार बुधवारपासून कामबंद आंदोलन सुरू करण्यात आले आहे.
यावेळी तलाठी संघाचे पुणे विभागीय सरचिटणीस समीर मुजावर, पंढरपूर तालुकाध्यक्ष एस. आर. डोरले, सचिव प्रशांत शिंदे, नायब तहसीलदार मनोज श्रोत्री, महसूल नायब तहसीलदार पंडित कोळी, तलाठी राजेंद्र वाघमारे, विजय जाधव, के. एच. गायकवाड, अनुप्रीता शेलार, रोहिणी पाटील उपस्थित होते.
फोटो : तहसीलदार सुशीलकुमार बेल्हेकर यांना निवेदन देताना तलाठी संघाचे पुणे विभागाचे सरचिटणीस समीर मुजावर, पंढरपूर तालुकाध्यक्ष एस. आर. डोरले, सचिव प्रशांत शिंदे, नायब तहसीलदार मनोज श्रोत्री, तलाठी राजेंद्र वाघमारे, विजय जाधव आदी.