लोकमत न्यूज नेटवर्कसोलापूर : तेरा वर्षांपासून वेतन होत नसल्याने व शालार्थ आयडी न मिळाल्याने नैराश्यातून चंद्रभागाबाई यलगुलवार प्रशालेतील शिपायाने पत्नीचा हात धरून मार्डीमधील नरोटेवाटी येथील आपल्या शेतातील तळ्यात उडी मारली. यात हणमंत विठ्ठल काळे (वय ३६, रा. मार्डी, ता. उत्तर सोलापूर)यांचा मृत्यू झाला, तर लवकर पाण्यातून बाहेर काढण्यात आल्याने सुनीता विठ्ठल काळे यांना वाचवण्यात यश आले, अशी माहिती त्यांच्या नातेवाईकांनी दिली.
मृत हणमंत काळे हे यलगुलवार शाळेत शिपाई म्हणून काम करत होते. त्यांना मागील १३ वर्षांपासून शालार्थ आयडी मिळालेली नव्हती, यासाठी ते वारंवार पाठपुरवठा करत होते. यामुळे त्यांनी बुधवारी सकाळी शेतातील तळ्यात पत्नीचा हात धरून उडी मारली. त्यावेळी मुलेही त्यांच्या जवळच होती. हे चित्र पाहिल्यानंतर मुलांनी लगेच आरडाओरडा सुरू केला. नातवंडांचा आवाज ऐकून विठ्ठल काळे हे घराजवळून पळत येऊन त्यांनी शेततळ्यात उडी मारली. त्यांनी सुनेला वर काढले. त्यानंतर मुलाला पाण्याबाहेर काढले. रुग्णालयात नेले असता डॉक्टरांनी हणमंत यांना मृत घोषित केले.