दुधनीच्या मार्केटमध्ये दरवर्षी मूग, उडीद, सूर्यफूल, सोयाबीन, तूर, मका, ज्वारी,गहू आदी धान्यांची मोठ्या प्रमाणावर विक्री होत असते. आंध्रप्रदेश, केरळ, तामिळनाडू, गुजरात आदी राज्यातील व्यापारी दुधनीच्या बाजार समितीत आवर्जून खरेदी करण्यासाठी येत असतात. सद्यस्थितीत मूग व उडदाला सहा हजार रुपये हमीभाव असताना उडदाला आठ हजार, तर मूग सात हजार रुपये क्विंटलने विक्री होत आहे. साधारणतः रास केल्यानंतर मालामध्ये काड्या, मातीचे कण, केरकचरा, कसपट किंवा माल कच्चा असणे अशा विविध समस्या असतात; मात्र दुधनीत प्रत्येक व्यापारी शेतकऱ्यांच्या शेतमालास कोणतेही नाव न ठेवता जागेवरच जास्तीत जास्त दामाने विक्री करतात. विशेष म्हणजे चाळणी न करता मालाचे वजन केले जाते. यामुळेच शेतकऱ्यांना दुहेरी फायदा होतो.
..........
जैसे थे माल वजन केले जात असल्याने दाम जास्त मिळतो.इतर ठिकाणी अगोदर कमी किमतीने माल मागून नंतर चाळणी करून मालाचे वजन केल्याने घट झालेल्या मालामुळे दाम कमी मिळतो. मी दोन वर्षांपासून दुधनीच्या बाजारात माल विकत आहे.
-खंडू कोरे, शेतकरी, चपळगाव
.............
स्व. सातलिंगप्पा म्हेत्रे यांनी आयुष्यभर शेतकऱ्यांचे हित जोपासले आहे. त्यांनीच विना चाळणी वजन करण्याचा पायंडा घातला. तो आजही अविरतपणे सुरू आहे. यामुळे गेल्या दोन वर्षांपासून शेजारील जिल्ह्यातून शेतीमालाची मोठ्या प्रमाणावर आवक होत आहे. यापुढील काळात शेतकऱ्यांच्या हितासाठी सदैव प्रयत्न असेल.
-प्रथमेश म्हेत्रे, सभापती, दुधनी बाजार समिती