सोलापूर : कोरोना महामारीच्या पार्श्वभूमीवर यंदा सोलापुरातील गणेशोत्सव साधेपणाने साजरा करण्याचे आवाहन सार्वजनिक मध्यवर्ती श्रीगणेशोत्सव मंडळाने केले आहे. ना वर्गणी...ना देणगी...जागेवरच प्रतिष्ठापना करण्यात येणार आहे. प्रतिष्ठापना व विसर्जन मिरवणुक काढायची की नाही याबाबत अद्याप निर्णय झाला नसल्याची माहिती सार्वजनिक मध्यवर्ती मंडळाचे ट्रस्टी माजी आमदार नरसिंग मेंगजी यांनी पत्रकार परिषदेत दिली.
यंदाच्या वर्षी कोरोना महामारीने संपूर्ण जगासोबत भारत देशाला ही ग्रासले आहे़ गेल्या तीन चार महिन्यांपासून संपूर्ण जनतेला या संकटाचा सामना करावा लागत आहे. या पार्श्वभूमीवर यंदा शनिवार २२ आॅगस्ट गणेश चतुर्थीपासून गणेश उत्सव अत्यंत साधेपणाने साजरा करण्याचे ठरले़ ज्या मंडळाच्या गणपती मुर्ती मंदिरात आहेत त्यांनी तेथेच दहा दिवसांचा उत्सव साजरा करावा, इतर मंडळांनी ही रस्त्यांवर मंडप न मारता खासगी जागेत साधेपणाने छोट्या मुर्ती आणून किंवा गणेश प्रतिमा ठेवून उत्सव साजरा करावा असे आवाहन सार्वजनिक महामंडळाच्या पदाधिकाºयांनी केले आहे़ यंदाच्या वर्षी कोणाकडूनही कुठल्याही प्रकारची वर्गणी, देणगी न घेता जनतेला व प्रशासनाला सहकार्य करावे असेही बैठकीत ठरल्याचेही माजी आमदार नरसिंग मेंगजी यांनी सांगितले़ या पत्रकार परिषदेला सुनील रसाळे, विजय पुकाळे, संजय शिंदे उपस्थित होते.