सोलापूर : गेल्या चार दिवसात राज्य शासनाकडून लसीचा पुरवठा न झाल्याने जिल्ह्यातील लसीकरण ठप्प झाले आहे. तर इकडे डेल्टा संसर्गाच्या भीतीने राज्य शासनाने दुसरा स्तर रद्द केल्याने सोलापुरात तिसरास्तर लागू करण्यात आला असून, दुकानदारांना कोरोना चाचणी व लस घेतल्याचे प्रमाणपत्र बंधनकारक केले आहे. पण गेल्या चार दिवसापासून लस नसल्याने व्यापारी हैराण झाले आहेत. एकही लस नाही टोचायला, निघाले दुकान बंद करायला अशा संतप्त प्रतिक्रिया व्यक्त होत आहेत.
पुणे आरोग्य उपसंचालक कार्यालयाकडून २४ जूनला सोलापूर जिल्ह्यासाठी २० हजार ४०० डोसचा पुरवठा झाला होता. यावर शुक्रवार व शनिवारी लसीकरण सत्र पार पडले. पण त्यानंतर लसीचा पुरवठा न झाल्याने रविवार व सोमवार, मंगळवार असे तीन दिवस झाले लसीकरण ठप्प झाले आहे. लसीच्या पुरवठ्याबाबत निरोप नसल्याने डॉक्टर व आरोग्य कर्मचारी निवांत झाले आहेत. सध्या सर्वांसाठी लसीकरण सुरू झाले आहे. त्यामुळे प्रतिसाद वाढला आहे. पण लस पुरवठा नसल्याने नागरिक वैतागले आहेत. लस कधी येणार अशी चौकशी आरोग्य विभागाकडे सुरू आहे. पण लसीच्या पुरवठ्याबाबत पुणे आरोग्य विभागाकडून कोणतीच सूचना आली नसल्याने लसीकरण समन्वयक डॉ. अनिरुद्ध पिंपळे यांनी सांगितले.
दुसरीकडे शासनाने सोमवारपासून कोरोनाचे नवे नियम लागू केले आहेत. त्यामुळे सोलापूर जिल्ह्यात तिसऱ्या सस्तरातील म्हणजे दुपारी चार वाजेपर्यंत दुकान उघडण्यास परवानगी देण्यात आली आहे. अशात राज्य शासनाच्या निर्देशाप्रमाणे महापालिका आयुक्त पी. शिवशंकर यांनी सोमवारी सायंकाळी दुकानदार, कारखानदार व उद्योजकांना कोरोना चाचणी व लस घेतल्याचे प्रमाणपत्र बंधनकारक केले आहे. अन्यथा दंडात्मक व फौजदारी कारवाईचा इशारा दिला आहे. त्यामुळे व्यापारी, दुकानदार लस घेण्यासाठी आरोग्य केंद्रावर गेल्यावर चार दिवसापासून शासनाकडून लसीचा पुरवठा झाला नसल्याचे सांगण्यात आले.
आयुक्तांनी दिले पत्र
महापालिका आयुक्त पी. शिवशंकर यांनी राज्य कुटुंब कल्याणच्या अतिरिक्त संचालकांना लस पुरवठ्याबाबत २८ जून रोजी पत्र दिले आहे. काेरोनाची संभाव्य तिसरी लाट थोपविण्यासाठी मनपाने ४० केंद्रावर लसीकरण सुरू केले आहे. पण २२ जूनपासून शहराला लसीचा पुरवठा झालेला नाही. त्यामुळे नागरिक लसीकरणापासून वंचित राहत आहेत तर दुसरीकडे लसीकरणासाठी नियुक्त केलेल्या कर्मचाऱ्यांना बसून भत्ता द्यावा लागत आहे. १८ ते ४४ वयोगटासाठी लसीकरण सुरू केले असून सुमारे साडेतीन लाख लाभार्थी आहेत. हे लाभार्थी लसीबाबत वारंवार विचारणा करीत आहेत.परिस्थितीचे गांभीर्य ओळखून शासनाने जास्तीजास्त लसीचा पुरवठा तात्काळ करावा अशी विनंती केली आहे.
फक्त १८.७ टक्के लसीकरण
सोलापूर जिल्ह्यात आतापर्यंत सर्व वयोगटातील लोकांना फक्त १८.७ टक्के पहिला डोस देण्यात आला आहे. वयोगटानुसार आतापर्यंत असे लसीकरण झाले आहे. पहिला डोस : आरोग्य कर्मचारी : १०० टक्के, फ्रंटलाईन वर्कर : १०० टक्के, ४५ ते ५९ वर्षे : २०.१ टक्के, ६० वर्षांवरील : ६२.६ टक्के, १८ ते ४४ वर्षे : २.४ टक्के, एकूण : १८.७ टक्के.