सोलापूर : जिल्ह्यात अद्याप ४७ गावांमध्ये नळपाणीपुरवठा योजना नाही. सन २०२४ पर्यंत सर्व गावे नळपाणीपुरवठा योजनेने जोडण्याचे उद्दिष्ट असून, ही योजना यशस्वी करण्यासाठी ग्रामीण पाणीपुरवठा विभागाच्या रिक्त पदांवर महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाकडील कार्यकारी अभियंत्याची नियुक्ती करण्यात आल्याची माहिती जिल्हा परिषदेचे प्रभारी अभियंता सुनील कटकधोंड यांनी ‘लोकमत’ शी बोलताना दिली.
सोलापूर जिल्ह्यात १0२९ गावे आहेत. यातील १0८७ गावांमध्ये नळपाणीपुरवठा योजना आहे, उर्वरित ४७ गावांमध्ये अद्याप पाणीपुरवठा योजना राबविलेली नाही. केंद्र शासनाने जलजीवन मिशन योजना आणली आहे. या योजनेंतर्गत २0२४ पर्यंत सर्व खेड्यांमधील प्रत्येक घरात नळाचे पाणी देण्याचे उद्दिष्ट आहे. या योजनेनुसार या उर्वरित गावात नळपाणीपुरवठा योजना राबवायची आहे. या योजनेत उर्वरित गावांचा आराखडा सादर करण्यात आला आहे अशी माहिती प्रभारी अभियंता सुनील कटकधोंड यांनी दिली.
जिल्हा परिषदेमार्फत जलजीवन मिशन योजना राबविली जाणार आहे. या योजनेची प्रभावी अंमलबजावणी होण्यासाठी या विभागातील रिक्त पदांवर गुरुवारी जीवन प्राधिकरणकडील कार्यकारी अभियंत्याची नियुक्ती करण्यात आली आहे. सोलापूरसाठी पी. सी. भांडारकर यांची नियुक्ती करण्यात आली आहे. सध्या जिल्हा परिषदेकडील लघु पाटबंधारे विभागाचे पद रिक्तच आहे.
स्वच्छ भारत मिशनचे काय...ग्रामीण पाणीपुरवठा योजनेसाठी यापूर्वी जलस्वराज्य योजना राबविली गेली होती. जिल्हा परिषदेत याचे दोन भाग आहेत. स्वच्छता व पाणीपुरवठा विभागाकडे नव्याने अधिकारी नियुक्त झाले आहेत. या विभागात कंत्राटी कर्मचारी आहेत. पण जलजीवनचे कर्मचारी नियुक्त झाल्यावरच काम सुरू होणार असल्याचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी शेलार यांनी सांगितले.