रेवणसिद्ध जवळेकर
सोलापूर : चुलीच्या तव्यावरील गरम भाकरी वाळवताना त्यातील तंतू (फायबर) म्हणजे ओलसरपणा पूर्णत: गेला तर तयार झालेली कडक भाकरी ही पाच महिन्यांपर्यंत ताजीच राहते. गेल्या अनेक वर्षांपासून सोलापुरी कडक भाकरीचा आस्वाद ग्राहकांना मिळवून देणारे इतर जिल्ह्यातील, परप्रांतांतील हॉटेल्सवाल्यांनीही ‘सोलापुरी कडक भाकरी ताजीच’ असा दाखला दिला आहे.
रविवारी पंढरपुरात एस. टी. महामंडळाच्या यात्री निवास आणि विस्तारित बसस्थानकाच्या भूमिपूजन सोहळ्याप्रसंगी राज्यभरातून आलेल्या वारकºयांना भोजनात कडक भाकºया ठेवण्यात आल्या होत्या. त्यावेळी काही वारकºयांनी देण्यात आलेली कडक भाकरी शिळी असल्याच्या तक्रारी केल्या होत्या. त्यावर स्पष्टीकरण करताना आयोजक म्हणाले, कडक भाकरी अन् शेंगाची चटणी हा सोलापुरी खास मेनू असल्याचे सांगून त्यांचे समाधान केले होते.
कडक भाकरी शिळी की ताजी, यावर ‘लोकमत’ने सोलापुरातील कडक भाकरी बनविणाºया महिला व्यावसायिक आणि हॉटेलमध्ये कडक भाकरी ठेवणाºया हॉटेल व्यावसायिकांना बोलते केले असता त्यांनी कडक भाकरी पाच महिन्यांपर्यंत ताजीच असते, असा निर्वाळा दिला. आलेल्या मागणीनुसार मी जेव्हा-जेव्हा कडक भाकरी पोहोच करतो, तेव्हा-तेव्हा तेथील मागणी वाढतच असते. यावरुन सोलापुरी कडक भाकरी ताजी असल्याचाच अनुभव येत असल्याचे कडक भाकरी बनविणारे नीलकंठ स्वामी यांनी ‘लोकमत’शी बोलताना सांगितले.
भाकरीतील ओलावा घालविल्याने ती ताजी- सुलोचना - हाताने बडवलेली भाकरी चुलीवरील अथवा गॅसवरील तव्यावर ठेवली जाते. गरम झालेली भाकरी आधी विस्तवासमोर आडवी केली जाते. नंतर ती मोकळ्या हवेत अथवा पंख्याखाली वाळवली जाते. त्यातील पूर्णत: तंतू नष्ट झाल्यावरच ती अगदी कडक बनते. प्रत्येक भाकरी न् भाकरीतील ओलावा नष्ट केल्यावरच ती अशी कडक बनते, ती किमान ५ महिन्यांपर्यंत ताजीच राहते, असे सोलापुरातील मजरेवाडी येथील ७५ वर्षीय सुलोचना स्वामी यांनी ‘लोकमत’शी बोलताना स्पष्ट केले. गेल्या १०-१२ वर्षांपासून सोलापूर जिल्ह्यासह मुंबई, पुणे, कोल्हापूर, सांगली, लातूर, बंगळुरु, हैदराबाद येथील हॉटेल व्यावसायिक सातत्याने भाकरीची आॅर्डर देत असताना कधीच शिळी असल्याची तक्रार आजपर्यंत केली नसल्याचेही सुलोचना स्वामी यांनी सांगितले.
ज्यांना माहीत नाही, त्यांना शिळीच वाटणार- सुरेखा स्वामी- सोलापुरी कडक भाकरीची चव सातासमुद्रापार गेली आहे. आज आमच्याकडे जिल्ह्याच नव्हे तर राज्यासह परप्रांतातील हॉटेल व्यवसायिक, घरगुती ग्राहक खास कडक भाकरी घ्यायला येतात. आजपर्यंत त्यांना या भाकरी कधीच शिळ्या वाटल्या नाहीत. सोलापुरी कडक भाकरीची ज्यांनी कधीच आस्वाद घेतला नाही, त्यांना ही भाकरी दिल्यावर शिळीच वाटणार, असे मत सुरेखा नीलकंठ स्वामी यांनी व्यक्त केले. वीरभद्रेश्वर कडक भाकरी सेंटरमधून दररोज दीड-दोन हजार भाकरी राज्यात इतरत्र जात असल्याचेही त्यांनी सांगितले.
मी १५-२० वर्षांपासून हॉटेल व्यवसायात आहे. सोलापुरात कडक भाकरी बनविणाºया अनेक महिला आहेत. हॉटेलमध्ये येणारा प्रत्येक ग्राहक कडक भाकरीच मागतो. मागणीनुसार कडक भाकºया आल्या तर आमच्याकडे त्या एक-दीड महिने असतात. तरीही त्या ताज्याच असतात. जाताना ग्राहक हमखास ‘क्या कडक भाकरी थी. मजा आया’, असे दाखला देतात.-शेखर बिद्री (सावजी हॉटेल)
कडक भाकरी हे सोलापूरचे ब्रँडिंग झाले आहे. आमच्या हॉटेलमध्ये कुटुंबासमावेत येणारे ग्राहक ‘सोलापुरी कडक भाकरी आहे ना’ अशी विचारणा करुन त्या भाकरीचा आस्वाद घेतात. सोलापुरी कडक भाकरी ही पाच महिने ताजी असते, असा माझा अनुभव आहे.-गौरीशंकर नागठाण,हॉटेल व्यावसायिक, मोहोळ.