सोलापूर : मृग नक्षत्रात दुसऱ्या आठवड्यात दडी मारलेला पाऊस आद्रा नक्षत्रातही पाच दिवस गायब होता. मात्र, शनिवारी सायंकाळी तालुक्यातील पाच मंडलात एकूण ३४ मि.मी. पडलेल्या पावसाने समाधान व्यक्त होत आहे. किमान खरीप पेरणी झालेल्या पिकांसाठी पोषक ठरेल असे शेतकऱ्यांचे मत आहे.
यावर्षी जून महिन्यात पावसाने चांगली सुरुवात केली होती. मागील वर्षापेक्षा यंदा चांगला पाऊस पडल्याने तालुक्यातील शेतकऱ्यांनी खरीप पेरणी केली. मात्र, आठ-दहा दिवस पाऊस गायब झाल्याने शेतकऱ्यांतून चिंता व्यक्त केली जात होती. पुरेशी ओल नसल्याने मूग, उडीद, सोयाबीन, मका, तूर, भूईमूग व इतर पेरणी थांबविली आहे. मात्र, शनिवारी सायंकाळी तालुक्यातील काही गावांत पावसाच्या सरी कोसळल्या. खरीप पिकांशिवाय इतर पिकांनाही हा पाऊस फायद्याचा ठरणार आहे.
--
‘कोल्हा’ लबाड कसा?
मृग नक्षत्रात पडलेल्या पावसाच्या कमी ओलीवर शेतकऱ्यांनी खरीप पेरणी केली. २१ जूनला आद्रा नक्षत्राला सुरुवात झाली. आद्रा नक्षत्राचे पाच दिवस कोरडे गेले. मात्र, शनिवारी सहाव्या दिवशी चांगला पाऊस पडला. आद्रा नक्षत्राचे वाहन कोल्हा आहे. वाहन कोल्हा असताना पाऊस पडला तर कोल्हा लबाड कसा? असा प्रश्न उपस्थित होत आहे. शनिवारी उत्तर तालुक्यातील पाचही मंडलात एकूण ३४ मि.मी. पाऊस पडला. त्यामुळे जून महिन्यात एकूण १४२ मि.मी., तर १३६ टक्के पाऊस पडला.