राकेश कदम. सोलापूर
अक्कलकोट राेड औद्योगिक वसाहतीमध्ये गेल्या दीड महिन्यात ४ नव्हे तर १२ कारखान्यांना आग लागली हाेती. आगीचे प्रकार राेखण्यासाठी या भागात तातडीने अग्निशामक दलाचे नवे केंद्र उभारण्यात यावे, अशी मागणी काॅंग्रेसच्या आमदारप्रणिती शिंदे यांनी मंगळवारी विधानसभेत केली.
मागील काही दिवसापासून अक्कलकोट एमआयडीसी परिसरात सातत्याने कारखान्यांना आगी लागत आहेत. या आगीवर नियंत्रण मिळविण्यासाठी केंद्राची गरज आहे. मागील महिन्यात चार कारखान्यांना आग लागल्याचे भाजप आमदारांनी म्हटले हाेते. आमदार शिंदे म्हणाल्या, देशमुखांनी ४ कारखान्यांना आग लागल्याचे म्हटले हाेते. पण १२ कारखान्यांना आग लागल्याची नाेंद आहे. या आगीत कोट्यावधी रूपयांचे नुकसान झाले आहे. शेकडो कामगार बेरोजगार झाले आहेत. कापड, टेक्सटाईल्स, पाईप्स, फर्निचर असे ६०० हून अधिक कारखाने आहेत. या कारखाना परिसरात एक अत्याधुनिक तंत्रज्ञानासहित असलेल्या गाड्या उभा करून अग्निशामक दलाचे केंद्र उभा करण्याची मागणी विधानसभेत आमदार प्रणिती शिंदे यांनी केली आहे. कारखानदारांचे नुकसान भरपाई द्या, बेरोजगार झालेल्या कामगारांचे पुर्नवसन करा अशीही मागणी आ. शिंदे यांनी केली आहे. यानंतर उद्योगमंत्री उदय सामंत यांनी सकारात्मक उत्तर देत लवकरच केंद्राची उभारणी होईल असे सांगितले.