साेलापूर : पाॅझिटिव्हिटी रेट कमी झाल्याने पुण्यातील निर्बंध कमी करण्याची घाेषणा उपमुख्यमंत्री अजित यांनी केली आहे. पुण्यापेक्षा साेलापूर शहराचा पाॅझिटिव्हिटी रेट कमी आहे. तरीही येथील निर्बंध कमी करण्याबाबत विचार का हाेत नाही, असा प्रश्न व्यापाऱ्यांनी उपस्थित केला आहे.
पाॅझिटिव्हिटी रेट एखादा टक्का असेल तिथे निर्बंध कमी करण्यास मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी हाेकार दिला आहे. त्यानुसार पुण्यातील निर्बंध कमी करण्याचा विचार सुरू आहे. लाेक साेमवार ते शुक्रवार काम करतात. त्यामुळे शनिवार, रविवार माेकळीक हवी आहे, असेही उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी शुक्रवारी पुण्यात सांगितले. साेलापूर शहरातील निर्बंध हटविण्यात यावेत अशी मागणी पुढे येत आहे. राष्ट्रवादीचे कार्याध्यक्ष संताेष पवार आणि युवक अध्यक्ष जुबेर बागवान यांनी नुकतेच उपमुख्यमंत्री अजित पवार आणि पालकमंत्री दत्तात्रय भरणे यांना या मागणीचे निवेदनही दिले हाेते. उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या पुण्यातील घाेषणेनंतर व्यापारी आक्रमक झाले आहेत. साेलापूर शहराचा जुलै महिन्यातील पाॅझिटिव्हिटी रेट ०.९७ टक्के आहे. मृत्यूदर सहा टक्के असला तरी मुळातच रुग्णांची संख्या कमी आहे. त्यामुळे मृत्यूदर वाढला असे म्हणता येत नाही. शहरातील रुग्णालयांमध्ये केवळ सहा टक्के ऑक्सीजन बेडवर रुग्ण आहेत. महापालिकेने दुकानदार, व्यापाऱ्यांवर कडक निर्बंध घातले आहत. दुकानदारही नियम पाळत आहेत. या सर्व गाेष्टींचा विचार करता दुकानांवरील निर्बंध हटविण्यात यावेत, अशी मागणी व्यापाऱ्यांनी केली.
---
शहराचा पाॅझिटिव्हिटी रेट
- मार्च - १२.२८
- एप्रिल - १२.१२
- मे - ४.४४
- जून - ०.६७
- जुलै - ०.९७
-----
यंदाच्या आठवड्याचा अहवाल
- पाॅझिटिव्हिटी रेट - १.७ टक्के
- बेडवर उपचार सुरू - ६.३२ टक्के
---
पुण्याचा पाॅझिटिव्हिटी रेट -
- ३.०२ टक्के
-------
पुन्हा आंदाेलनाचा इशारा
पुण्यापेक्षा साेलापुरातील रुग्णसंख्या कमी आहे. पालकमंत्री पुणे जिल्ह्यातूनच येतात. पालकमंत्र्यांनी दाेन दिवसांत आढावा घेऊन निर्बंध शिथिल करण्याचा विचार करायला हवा. सर्व व्यापारी असाेसिएशनचे पदाधिकारी संपर्कात आहेत. साेमवारपासून शहरातील दुकानांना रात्री आठ वाजेपर्यंत परवानगी द्यायला हवी. आम्ही नियमांचे पालन करायला तयार आहाेत. अन्यथा आंदाेलन करु.
- केतन शहा, प्रमुख, पार्क राेड शाेरूम्स असाेसिएशन.