अशोक कांबळे
मोहोळ : लोकसभा निवडणुकीच्या प्रचारात काँग्रेस,राष्ट्रवादी, शिवसेना, भाजपसह नव्याने उभारी घेतलेल्या बहुजन वंचित आघाडीच्या प्रचारादरम्यान सर्वच पक्षातील नेत्यांनी व आगामी विधानसभेसाठी इच्छुक असणाºया उमेदवारांनी लोकसभेच्या प्रचाराबरोबरच विधानसभेचीच तयारी केल्याचे दिसत आहे. विधानसभेसाठी सेना, भाजपची युती झाली नसली तरीही भविष्यातील अंदाज ओळखून भाजपच्या प्रचारात ‘सेना’ उतरल्याचे स्पष्ट जाणवले.
याच निवडणुकीत अर्थ व बांधकाम समितीचे सभापती विजयराज डोंगरे यांनी राष्ट्रवादीशी फारकत घेतल्यानंतर लोकसभेच्या निवडणुकीच्या तोंडावर भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश केला. यातून विधानसभेसाठी उमेदवार आपल्याच शिफारशीचा मिळावा, यासाठी ताकद पणाला लावून प्रचारामध्ये भाग घेतल्याचे दिसून आले.
शिवसेना-भाजपच्या माध्यमातून आपली ताकद दाखवण्यासाठी मागील विधानसभेच्या निवडणुकीत नंबर दोनची मते मिळवणारे भाजपचे संजय क्षीरसागर यांनी मोहोळ विधानसभेची भाजपची प्रचाराची धुरा स्वत:कडेच ठेवत विधानसभेची तयारी दाखवून दिली, तर त्यांचे थोरले बंधू नागनाथ क्षीरसागर यांनी दोनवेळा लोकसभा तर दोनवेळा विधानसभा लढवून भाजपला अडचणीच्या काळात साथ देत मतदारसंघात भाजपा जिवंत ठेवली व या निवडणुकीत भाजपने दिलेली जबाबदारी सांभाळत आगामी विधानसभेची पेरणी केल्याचे दिसून आले.
दुसरीकडे विधानसभेसाठी राष्ट्रवादी व काँग्रेसची आघाडी होईल किंवा नाही हे लक्षात घेऊन मागील विधानसभेत काँग्रेसच्या माध्यमातून निवडणूक लढविलेले काँग्रेसचे मागासवर्गीय सेलचे जिल्हाध्यक्ष गौरव खरात यांनीही या निवडणुकीत सुशीलकुमार शिंदे यांच्या प्रचारात मतदारसंघ ढवळून काढला. प्रकाश आंबेडकरांच्या नेतृत्वाखाली स्थापन झालेल्या बहुजन वंचित आघाडीने अनपेक्षितरित्या लोकसभेत घेतलेली भरारी पाहता मोहोळ विधानसभेची तयारी म्हणून भीम प्रतिष्ठानचे संस्थापक अॅड. विनोद कांबळे यांनीही तालुक्यासह मतदारसंघात बहुजन वंचित समाज एकत्र करीत विधानसभेची जोरदार तयारी सुरू केली आहे.
पंचवीस वर्षे एकहाती सत्ता सांभाळणाºया माजी आमदार राजन पाटील यांच्या एकहाती सत्तेला सुरुंग लावण्यासाठी सर्व विरोधक एकीकडे तर राजन पाटलांची राष्ट्रवादी एकीकडे अशा परिस्थितीत या लोकसभेच्या निवडणुकीत माजी आमदार राजन पाटील, लोकनेतेचे अध्यक्ष बाळराजे पाटील, युवक काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष अजिंक्यराणा पाटील यांनी सुशीलकुमार शिंदे यांच्या प्रचाराबरोबरच आगामी विधानसभेत राष्ट्रवादीचा किल्ला मजबूत ठेवण्यासाठी वाड्या-वस्त्यांसह मतदारसंघ पिंजून काढला.
यंदा ‘उत्तर’ हवे- मोहोळ तालुक्यासह उत्तर सोलापूरची २७ गावे तर पंढरपूर तालुक्यातील १७ गावे या मतदारसंघाला जोडलेली आहेत. गेली दोन टर्म मोहोळ तालुक्याला उमेदवारी मिळाली. परंतु राष्ट्रवादीच्या माध्यमातून सातत्याने बाहेरूनच उमेदवार आणला जातो. आता स्थानिक उमेदवाराला प्राधान्य मिळावे, यासाठी उत्तर सोलापूर तालुक्याच्या परिसरातून स्थानिक उमेदवार शोधण्याचे काम त्या परिसरातील नेतेमंडळी करीत आहेत.